Headlines

6 महिन्यांनंतर प्रशासनाला जाग:पोळ्याच्या मुहूर्तावर दत्तपूर-सेवाग्राम मार्गावर गतिरोधक




मंत्र्यांचा दौरा दत्तपूर-सेवाग्राम मार्गाने जाणार असल्याने या मार्गावरील गतिरोधक काढण्यात आल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. त्यानंतर काढण्यात आलेले गतिरोधक पुन्हा बसविण्यासाठी सातत्याने पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या चालढकल कारभारामुळे तब्बल सहा महिने गतिरोधक बसविण्याचे काम रखडले होते. अखेर पोळा सणाच्या मुहूर्तावर प्रशासनाला जाग आली असून, गतिरोधक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दत्तपूर-सेवाग्राम मार्गावरील गतिरोधक २ एप्रिल रोजी काढण्यात आले होते. त्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत झालेल्या बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही गतिरोधक बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? अशा प्रकारची चर्चा परिसरात रंगू लागली होती. दरम्यान, सुमारे आठ दिवसांपूर्वी याच मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात शाळकरी वाहन आणि रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.जड वाहने महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात जाणारे जड वाहने सुसाट वेगाने या मार्गाने जात असताना,मोठ्या प्रमाणात शाळकरी वाहने व दुचाकीने विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती. या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग वाढत असून, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाला गतिरोधक बसविण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. अखेर पोळा सणाच्या मुहूर्तावर गतिरोधक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी सहा महिने का लागले, हा असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *