Headlines

आयआयएम नागपूर गोव्याची वाहतूक कोंडी सोडवणार:बांधकाम विभागासोबत सामंजस्य करार; सिग्नल आणि पार्किंगमध्ये सुधारणा सुचवणार




महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनंतर आता गोवा राज्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आयआयएम नागपूर मदत करणार आहे. आयआयएम नागपूरच्या ‘सेंटर फॉर लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ (क्लिप) या केंद्राच्या माध्यमातून गोव्यातील प्रमुख रस्त्यांसाठी वाहतूक सिम्युलेशन आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग मॉडेल तयार केले जाईल. यासाठी गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबत नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. हा करार ९ सप्टेंबर रोजी पणजी येथे पर्वरी येथील सहा पदरी उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कराराची देवाणघेवाण झाली. गोवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संदीप प्रभू चोडणेकर आणि आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी या करारावर सह्या केल्या. हा प्रकल्प १२ महिन्यांचा असेल. या अंतर्गत आयआयएम नागपूरचे ‘क्लिप’ पणजीतील केटीसी, दिवजा आणि मर्सेस सर्कलसह मडगाव आणि साखळी येथील रस्त्यांचे जाळे, वाहतुकीचे प्रमाण, प्रवासाचा कालावधी आणि पार्किंगशी संबंधित माहितीचे विश्लेषण करेल. पुढील १०, २० आणि ३० वर्षांतील वाहतुकीच्या मागणीचा अंदाज घेऊन सिग्नलच्या वेळा, चौकांची रचना आणि पार्किंग व्यवस्थेत आवश्यक सुधारणा सुचवल्या जातील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विश्वास व्यक्त केला की, आयआयएम नागपूरच्या या शिफारशींमुळे गोव्यातील वाहतुकीचा प्रवाह सुधारेल आणि नागरिक व पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होईल. संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी सांगितले की, क्षेत्रीय माहिती आणि सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावी पायाभूत व्यवस्था विकसित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी ‘क्लिप’ने नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारसोबत करार केले आहेत. गोवा हे सहकार्य करणारे तिसरे राज्य बनले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *