![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा अधिक गतिमान आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण लक्षात घेऊन त्यांनी हे निर्देश दिले. पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक, पाणी, पर्यावरण, उद्योग, पर्यटन आणि अग्निसुरक्षा यांचा एकत्रित विचार करून पुढील अनेक वर्षांचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीएच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात 674 गावे आणि सुमारे 5,215 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. या भागाचा नियोजित विकास करताना भविष्यातील लोकसंख्या आणि शहरीकरणाचा विचार करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. पुणे इनर रिंग रोडसह कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅनमधील प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिजच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. मल्टिमोडल हब, औद्योगिक व पर्यटन क्षेत्रे, धार्मिक स्थळे आणि विमानतळ यांना जोडणारी प्रभावी वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या मार्गावरील 23 स्थानकांपैकी 12 स्थानके पूर्ण झाली असून, आणखी पाच स्थानके अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्प उभारणीबरोबरच त्यांचे दीर्घकाळ संचालन व देखभाल आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील, याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. पीएमआरडीए क्षेत्रातील कासार आंबोली अग्निशमन केंद्राचे काम सुरू असून, आणखी 12 केंद्रे प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येसाठी नवीन जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील पाणी गरजांचे दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.
Source link
पीएमआरडीएचा विकास आराखडा अधिक गतिमान करा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश