Headlines

दीर्घ प्रतीक्षेनंतर संधी; सीईओंच्या हस्ते 190 शिक्षकांना नियुक्तीपत्रे:पदे भरल्याने आदिवासी भागात शैक्षणिक दर्जा उंचावणार‎




पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती प्रक्रियेतील अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, गुरुवारी १० सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषदेत आनंददायी वातावरणात १९० नवनियुक्त शिक्षण सेवकांना पदस्थापना व नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या भरती प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाल्याने आणि हातात थेट नियुक्तीपत्र पडल्याने उपस्थित शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने ही समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात आली. दुर्गम व आदिवासी बहुल मेळघाट या पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश होता. यासाठी पेसा क्षेत्राकरिता मराठी माध्यमातील आणि सर्वसाधारण क्षेत्रासाठी उर्दू माध्यमातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या या ऐतिहासिक प्रक्रियेत एकूण १९१ उमेदवारांपैकी १९० उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित होते. उपस्थित सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार व नियमानुसार समुपदेशनाद्वारे तात्काळ पदस्थापना देऊन नियुक्तीपत्रे हातात सोपवण्यात आली. या प्रक्रियेत केवळ एक उमेदवार अनुपस्थित राहिला, तर २ उमेदवारांनी वैयक्तिक कारणास्तव नियुक्ती नाकारली. मेळघाट पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या (वर्ग १ ते ५) ५४ पैकी ५३, तर वर्ग ६ ते ८ च्या गणित-विज्ञान विषयासाठी ७७ पैकी ७७ आणि भाषा विषयासाठी ३० पैकी ३० उमेदवार पूर्ण उपस्थित होते. सर्वसाधारण क्षेत्रातील उर्दू माध्यमाच्या वर्ग १ ते ५ मधील १९ आणि वर्ग ६ ते ८ मधील विविध विषयांचे ११ असे सर्वच्या सर्व पात्र उमेदवार या वेळी उपस्थित राहिले. विशेष म्हणजे, पेसा क्षेत्रातील वर्ग १ ते ५ मधील अगदी शेवटच्या क्रमांकावरील उमेदवारालाही मेळघाट क्षेत्रातच समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, उपशिक्षणाधिकारी सतीश मुगल, अधीक्षक नरेंद्र गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, विजय कविटकर, वरिष्ठ सहाय्यक विजय राऊत, राहुल काळमेघ, विजय मालोकार, निलेश दहातोंडे, विलास मेंदुकर, सुदर्शन भोसले, कनिष्ठ सहाय्यक विशाल कुळसंगे, अनिकेत हुरडे तसेच संगणक परिचालक अतुल देशमुख, श्याम देशमुख आणि युसुफ शहा यांच्यासह शिक्षण विभागाच्या संपूर्ण चमूने ही संपूर्ण प्रक्रिया बिनचूक आणि पारदर्शकपणे पूर्ण पाडली. नवनियुक्त शिक्षकांच्या या समावेशामुळे मेळघाटातील शैक्षणिक दर्जा नक्कीच उंचावेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *