![]()
पुण्यातील चंदननगर भागात आर्थिक वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे आहे. या प्रकरणी आशिष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष आणि राहुल हे मित्र आहेत. आशिष डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आशिष आणि राहुल यांच्यात आर्थिक कारणावरून वाद सुरू होता. चंदननगरमधील बोराटे वस्ती परिसरात त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी राहुलने आशिषला आईवरून शिवी दिली. यामुळे आशिष चिडला आणि त्याने त्याच्याकडील चाकूने राहुलवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुभाजकावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. आकाश प्रकाश पुरभे (वय २७, रा. सिद्धनाथ निवास, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस हवालदार रवींद्र टेंगले यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आकाश खराडी-हडपसर बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. भरधाव दुचाकी मगरपट्टा परिसरात दुभाजकावर आदळली. दुचाकीस्वार आकाश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांदरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. भरधाव वेगामुळे दुचाकी दुभाजकावर आदळून अपघात झाल्याची माहिती चौकशीत मिळाली. पोलीस हवालदार एस टेंगले पुढील तपास करत आहेत.
Source link
पुण्यात आर्थिक वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक:चंदननगरमध्ये मित्रानेच केली हत्या; आईवरून शिवीगाळ केल्याने संतापला आरोपी