![]()
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. गेल्या 36 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल राजू शेट्टी यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि पहिली उचल 4,500 रुपये देण्यात यावी, या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असून, महामार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आंदोलन सुरू असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अनेक वाहनचालकांना ताटकळत राहावे लागत असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. ‘शेतकऱ्यांचा ऊस लुटल्यासारखा नेला जात आहे’ या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नसून, त्यांचा ऊस लुटल्यासारखा नेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी वारंवार मागणी करूनही सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले. “एकीकडे लुटारू असल्यासारखा आमचा ऊस लुटून नेला जात आहे. सरकार आमचे काही ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत आम्ही करायचे तरी काय? न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत. या आंदोलनामुळे लोकांची गैरसोय होत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्याबद्दल आम्ही माफी मागत आहोत. मात्र, आमचा नाईलाज झाला आहे,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली. मुंबईच्या दिशेने जाणारे दूध आणि भाजीपाला रोखण्याचा इशारा दरम्यान, आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 4,500 रुपये मिळावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीवर तोडगा न निघाल्यास मुंबईच्या दिशेने जाणारा दूध आणि भाजीपाला रोखण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम केवळ महामार्गावरील वाहतुकीपुरता मर्यादित न राहता जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही होण्याची शक्यता आहे. महामार्गावरच शेतकऱ्यांचा मुक्काम गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनात राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी महामार्गावरच ठाण मांडून आहेत. आंदोलकांनी रस्त्यावरच स्वयंपाकाची व्यवस्था केली असून, जेवणाच्या पंगतीही महामार्गावरच सुरू आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ऊस दराचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास साखर कारखाने बंद पाडण्याचा आणि कोल्हापूर-सांगली परिसरातील ऊस वाहतूक रोखण्याचाही इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही या आंदोलनाचे परिणाम होण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदेंची आंदोलनस्थळी भेट या आंदोलनाला राजकीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे महामार्गावरील वाहतूक रोखल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी नागरिकांची माफी मागितली असली, तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन ऊस दराचा प्रश्न कसा सोडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळमध्ये 5 संचालक नेमण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे आव्हान:पवन खेरांची थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वानेही उडी घेतली आहे. गोकुळमध्ये 5 शासननियुक्त संचालक नेमण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी याबाबत थेट घोषणा केली आहे. सरकारने कायद्यात बदल करून निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता न्यायालयीन लढाईच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा….
Source link
कोल्हापुरातील रास्ता रोकोमुळे प्रवाशांची गैरसोय:राजू शेट्टींनी मागितली माफी, म्हणाले, आमचा नाईलाज झाला