Headlines

जिल्हा परिषदेतील 225 कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक झाले:संवर्ग बदलाचा शासन निर्णय; वेतनातील तफावत दूर होणार, 100 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी




अमरावती जिल्हा परिषदेतील २२५ कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांचा संवर्ग बदलून त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागातील वेगवेगळ्या कार्यालयांतील प्रशासन अधिकाऱ्यांचा एकच संवर्ग असावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. शासनाच्या निर्णयामुळे ही मागणी मान्य झाली आहे. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि अमरावतीचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्यासह संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात संवर्ग वेगळे असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंत्र्यांनी मागणी मान्य केली आणि शासन निर्णय जारी केला. अमरावती जिल्हा परिषदेच्या १४ विभागांत सुमारे ६०० लिपिकवर्गीय कर्मचारी आहेत. त्यापैकी २२५ कनिष्ठ प्रशासन अधिकारी आहेत. कनिष्ठ आणि सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदारी सारखी असली, तरी वेतनात फरक होता. संवर्ग बदलामुळे हा फरक दूर होऊन संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालय आणि १४ पंचायत समित्यांमध्ये सुमारे १५६ वरिष्ठ सहायक काम करतात. जुन्या पदनामानुसार त्यापैकी सुमारे १०० कर्मचारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर बढतीसाठी पात्र आहेत. आता त्यांना थेट सहाय्यक प्रशासन अधिकारी होता येईल. यात जिल्हा परिषद मुख्यालयातील ४५ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पंकज गुल्हाने म्हणाले, “जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. त्यासाठी आम्ही वेळोवेळी संघर्ष करतो. अनेकदा शासनासोबत मतभेदही होतात. योग्य वेळी योग्य मागणी मान्य करून घेण्यात संघटनेला यश मिळते. येत्या काळात संघटनेचे राज्य अधिवेशन अमरावतीत होणार आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *