Headlines

गोकुळमधील संचालक वाढीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल:म्हणाले, लोकांना जेनझीप्रमाणे रस्त्यावर उतरावे लागेल




राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोकुळ दूध संघातील संचालकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गोकुळसारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम सहकारी संस्थेत कायद्यात बदल करून हस्तक्षेप करणे, हा हुकूमशाही आणि दादागिरीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी जेनझी तरुणांप्रमाणे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. अन्यथा सरकार लोकांचे प्रश्न आणि आंदोलने दडपून टाकेल, असा इशाराही त्यांनी दिला. गोकुळमधील निर्णयावरून सरकारवर निशाणा गोकुळ दूध संघातील संचालकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीतून निवडून आलेल्या संचालकांचे अधिकार कमी करून आपल्या विचारांच्या लोकांना संस्थेत स्थान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळ ही आर्थिकदृष्ट्या उत्तम पद्धतीने चालणारी सहकारी संस्था आहे. अशा संस्थेवर कायद्यात बदल करून जबरदस्तीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. निवडून आलेल्या लोकांचे अधिकार काढून घेऊन आपल्या मर्जीतील व्यक्तींना तिथे बसवणे, हा लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारा प्रकार आहे. याविरोधात न्यायालयीन लढाई होऊ शकते; मात्र सरकारच निर्णय घेत असेल, तर सामान्य लोकांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘ही सर्व हुकूमशाहीची लक्षणे’ राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना चव्हाण यांनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडींचाही उल्लेख केला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून युती सरकारमधील मंत्र्यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांचा वापर करून मतदार याद्यांमधून 13 कोटी लोकांची नावे वगळल्याचा आरोप, ईव्हीएम मशीनबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि गोकुळमध्ये कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया, या सर्व बाबी लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. सत्तेवर आपले नियंत्रण कायम ठेवण्यासाठी संस्थांच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करणे, ही हुकूमशाहीची लक्षणे असल्याची टीका त्यांनी केली. जेनझी तरुणांच्या आंदोलनाचा दिला दाखला आपल्या हक्कांसाठी लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज असल्याचे सांगताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जेनझी तरुणांच्या आंदोलनाचा दाखला दिला. जेनझी तरुणांनी ज्या पद्धतीने सरकारच्या निर्णयांविरोधात तीव्र विरोध दर्शवला आणि सरकारला माघार घेण्यास भाग पाडले, त्याच पद्धतीने नागरिकांनीही संघटित होऊन आंदोलन करायला हवे, असे ते म्हणाले. जेनझींच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, असे त्यांनी नमूद केले. गोकुळसारख्या सहकारी संस्थांचा प्रश्न असो किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, लोकांनी तीव्र विरोध केला नाही तर सरकार अशा आंदोलनांकडे दुर्लक्ष करेल आणि ती दडपण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलताना चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधले. आपण काल झालेल्या सत्याग्रहात सहभागी झालो होतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर त्यांच्या मागण्यांना यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. सध्या दुष्काळी परिस्थिती असून महागाई सातत्याने वाढत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचा आणि उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याची परिस्थिती आहे. 2018 पासून उसाच्या एमएसपीमध्ये वाढ झालेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आणि असंतोष असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागत असेल, तर सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आंदोलन केले नाही तर हुकूमशाही आणखी कडक होईल’ गोकुळ दूध संघाचा प्रश्न असो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या असोत किंवा इतर सहकारी संस्थांशी संबंधित प्रश्न असोत, नागरिकांनी आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणे आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले नाही, तर सरकार कोणत्याही प्रश्नाची दखल घेणार नाही. उलट, हुकूमशाहीची प्रवृत्ती आणखी बळावेल आणि सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर मर्यादा येतील. त्यामुळे लोकांनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे गरजेचे आहे. अन्यथा हुकूमशाही अधिक कठोर होत जाईल आणि नागरिकांच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला जाईल, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. हेही वाचा…. ‘शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या’:अशैक्षणिक कामांच्या ओझ्याविरोधात शिक्षकांचा एल्गार, अंबाबाईच्या जयघोषाने जिल्हा परिषद परिसर दणाणला शाळांमधील शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे हे असताना, त्यांच्यावर दिवसेंदिवस अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्याचा आरोप करत शिक्षकांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शिक्षकांना बीएलओ, एसआयआर, जनगणना यांसारख्या प्रशासकीय कामांसह विविध ऑनलाइन माहिती संकलनाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे आणि त्यांना केवळ अध्यापनाचे काम करू द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (दि. 4 नोव्हेंबर) अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयावर जनता मोर्चा काढण्यात आला. ‘शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या’, असा जोरदार नारा देत शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विविध घटक या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षिकेने अंबाबाईच्या संचाराचा आविष्कार सादर केला, तर एका शिक्षकाने यमराजाची वेशभूषा केली होती. अंबाबाईच्या उदो उदो आणि जयघोषाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *