![]()
पाषाण परिसरात एका सुरक्षारक्षकाला धमकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी 40 हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय 26, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ रा. कर्नाटक) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ककेरी आणि त्यांचा मित्र पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे,’ असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावले. चोरट्यांनी ककेरीची झडती घेण्याचा बहाणा करत त्याच्या खिशातील 40 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. ककेरीने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे रोकड घेऊन पसार झाले. ककेरीने गावाला पैसे पाठवण्यासाठी ही रोकड खिशात ठेवली होती. घटनेनंतर तो घाबरला होता, मात्र त्याने नंतर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यापूर्वी नऱ्हे परिसरात एका मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती, ज्यात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. उपाहारगृहातील गल्ल्यातून दोन लाख 30 हजार रुपयांची रोकड चोरीला दरम्यान, बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर एका उपाहारगृहातील गल्ल्यातून दोन लाख 30 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाहारगृहाचे मालक सुनील चंद्रशेखर शेट्टी (वय 40, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी मध्यरात्री उपाहारगृहातील भटारखान्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोकड चोरून नेली. पोलिसांनी उपाहारगृहाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. पोलिस हवालदार एस. तायडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
सुरक्षारक्षकाला धमकावून 40 हजारांची रोकड लुटली:दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल, पाषाणमधील घटना