![]()
हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हिंजवडी, मान आणि मारुंजे परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा कंपनीनिहाय डेटा गोळा केला जाईल. त्यानुसार पीएमपीएमएलच्या बस मार्गांचे नियोजन केले जाईल आणि लगेच 20 ते 30 अतिरिक्त बस उपलब्ध केल्या जातील. भविष्यात येणाऱ्या 500 नवीन बसमध्ये हिंजवडी व चाकणला प्राधान्य दिले जाईल. मेट्रो स्थानकांपासून कार्यालये व घरांपर्यंत फिडर बससेवा देखील सुरू केली जाईल. रस्ते रुंदीकरणासाठी सहा प्रमुख रस्ते ठरवण्यात आले आहेत. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून १ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. रुंदीकरणातील अडथळा ठरणारे वीज खांब व भूमिगत केबल्स लगेच हलवण्यास सांगितले. सर्व्हिस रोडचे डांबरीकरण पुढील 10 ते 15 दिवसांत पूर्ण करण्याचेही आदेश दिले. वीजपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी लवळे व महाळुंगे येथील प्रस्तावित वीज उपकेंद्रांच्या कामाला गती दिली जाईल. तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा लगेच उपलब्ध करून काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींच्या एकत्रितपणे महिनाभरात कृती आराखडा तयार केला जाईल. सोसायट्यांमधील कचरा गोळा करण्यासाठी सात दिवसांत चांगली यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले. बसथांबे, बसशेल्टर व मेट्रो परिसराचे सुशोभीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते. पुढील आढावा बैठक गुरुवारी दुपारी चार वाजता घेतली जाईल.
Source link
हिंजवडीतील समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा:वाहतूक, पाणी, वीज प्रश्नांवर चर्चा; 30 अतिरिक्त बस, 6 रस्त्यांचे रुंदीकरण 1 डिसेंबरपासून