Headlines

महाराष्ट्राचे ढोल-ताशे थायलंडमध्ये वाजणार:पुणे येथील पथक गणेशोत्सवात तीन दिवस तीन संकल्पनांवर आधारित सादरीकरण करणार




महाराष्ट्राची पारंपरिक ढोल-ताशा वादनाची कला आणि संस्कृती थायलंडमधील फुकेत येथे यंदाच्या गणेशोत्सवात सादर केली जाईल. ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र आणि समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक पुणे यांच्या वतीने 20 वादकांचे एक पथक फुकेतला जाणार आहे. हे पथक 3 दिवस 3 वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित ढोल-ताशा वादन सादर करेल. ही माहिती ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला आमदार हेमंत रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शिरीष थिटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, राजाभाऊ चव्हाण, डॉ. अ. ल. देशमुख उपस्थित होते. फुकेतमधील ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ चे समन्वयक चेतन लोढा, कलावंत पथकाचे सौरभ गोखले, समर्थ प्रतिष्ठानचे संजय सातपुते, अथर्व कुलकर्णी, संदेश खरात आणि निरंजन माळवदकर हे देखील यावेळी हजर होते. यावेळी समन्वयक चेतन लोढा यांनी फुकेत येथील मंदिराची आणि उत्सवाची सविस्तर माहिती दिली. संजय सातपुते यांनी सांगितले की, भगवाधारी थीम, महाराष्ट्राचे पारंपरिक ढोल-ताशा वादन आणि पंढरीचे वारकरी वादन अशा वेगवेगळ्या प्रकारातून महाराष्ट्राची संस्कृती फुकेतमध्ये दाखवली जाईल. समर्थ प्रतिष्ठानचे पथक 13 सप्टेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता मुंबईहून फुकेतला रवाना होईल. तिथे 3 दिवस विविध प्रकारचे वादन सादर केले जाईल. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हे पथक फुकेतहून मुंबईकडे परत येईल. या पथकात 12 ढोल, 4 ताशा, 1 ध्वज आणि 1 टोल यांचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी वादनासोबत त्या-त्या संकल्पनेनुसार पारंपरिक पेहराव केला जाईल. कलाकार भगव्या कुर्त्यासह फेटा, पारंपरिक गणवेश, वारकरी पेहराव आणि नऊवारी साडी अशा वेशभूषेत सादरीकरण करतील. 14 सप्टेंबर रोजी भगवाधारी थीम, 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे पारंपरिक ढोल-ताशा वादन आणि 16 सप्टेंबर रोजी पंढरीचे वारकरी वादन सादर होईल. 18 सप्टेंबर रोजी सांगता मिरवणूक काढली जाईल, ज्यात कलावंत पथक सहभागी होईल. या मिरवणुकीत मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारही हजर असतील. या उपक्रमामुळे फुकेतमध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा वादनाचा आणि वारकरी संस्कृतीचा ठसा उमटेल. फुकेतमध्ये मोठ्या संख्येने गणेशभक्त आहेत. थायलंडमधील गणेशभक्त पापासोर्न मीपा यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती फुकेतमध्ये तयार केली आहे. या मंदिरात दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे. याच मंदिराच्या गणेशोत्सवात हे पथक वादनसेवा देणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *