![]()
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने २०२५-२६ गाळप हंगामासाठीचे देशपातळीवरील पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला ‘वसंतदादा पाटील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच, माजी मंत्री आणि महासंघाचे माजी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांना साखर उद्योगातील त्यांच्या कामासाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार २२ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात दिले जातील. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन्ही गाळप हंगामांसाठीचे पुरस्कार प्रदान केले जातील. २०२४-२५ गाळप हंगामासाठीचा देशपातळीवरील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार यापूर्वीच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. इतर प्रमुख पुरस्कार विजेत्यांमध्ये कर्नाटकातील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याला ऊस विकास विभागात पहिला क्रमांक मिळाला आहे. तांत्रिक कार्यक्षमतेत पुणे जिल्ह्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, आर्थिक व्यवस्थापन विभागात गुजरातमधील नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळी, उच्च साखर उतारा विभागात सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि संस्थात्मक सामाजिक दायित्व (सीएसआर) विभागात सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळेल. तसेच, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (नवी दिल्ली), पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सुरत सहकारी बँक यांना उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. २०२४-२५ आणि २०२५-२६ या गाळप हंगामातील एकूण ५७ पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील कारखान्यांनी २१ पुरस्कार पटकावून आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातला प्रत्येकी आठ, पंजाब आणि तमिळनाडूला प्रत्येकी पाच, हरियानाला तीन, कर्नाटक आणि छत्तीसगडला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले आहेत. मध्यप्रदेश, ओडिशा आणि दिल्लीला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे.
Source link
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना साखर उद्योगातील जीवनगौरव:राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे देशपातळीवरील पुरस्कार जाहीर; सांगलीच्या लाड कारखान्याला सर्वोत्तम सन्मान