![]()
रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्यामुळे पुणे शहर पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा आणि बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी या निलंबनाचे आदेश काढले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पोलिस शिपाई शुभम विजय सुर्वे, पोलिस शिपाई योगेश भागचंद्र एकशिंगे आणि पोलिस शिपाई अभिजीत अनिल शिंदे अशी आहेत. सुर्वे हे फरासखाना पोलिस ठाण्यात, तर एकशिंगे आणि शिंदे हे पुणे शहर वाहतूक शाखेत काम करत होते. निलंबन आदेशानुसार, या तिन्ही कर्मचाऱ्यांनी २ जुलै २०२६ रोजी ‘पीटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभाग घेतला होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे किंवा त्यांच्या खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणे गंभीर मानले जाते. या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा लोकांमध्ये खराब झाल्याचे आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर तिन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि मुंबई पोलिस अधिनियमातील नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात या कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार (निर्वाह भत्ता) मिळणार आहे. या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच, पुणे शहराची हद्द सोडण्यासाठी त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबन काळात शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात नियमित हजेरी लावण्यासही सांगण्यात आले आहे.
Source link
पुण्यात तीन पोलिस निलंबित:रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्याने अपर आयुक्तांची कारवाई