![]()
धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक तीव्र करण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शासनाच्या उरात धडकी भरविणारा ठरणार असल्याची दावा धनगर समाजाचे नेते तथा आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी शनिवारी ता. १२ हिंगोलीत पत्रकारांशी बोलतांना केला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात धनगर समाजाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शशीकांत वडकुते यांच्यासह समाजातील नेते व नागरीक उपस्थि होते. यावेळी बोलताना दीपक बोऱ्हाडे म्हणाले की, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या कित्येक पिढ्यांपासून आणि दशकांपासून सातत्याने कायदेशीर लढाई व संघर्ष सुरू आहे. जालना येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम लढा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. शासनाने निवडणुकीच्या काळात धनगर समाजाला दिलेल्या वचनांची व आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. सरकारने वारंवार धनगर समाजाला आरक्षणाबाबत आश्वासने दिली, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी फसवणूक केली. धनगर समाजाला आता सरकारच्या फसवणुकीचा राग आला असून, आपल्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी समाज आता ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. परभणी येथील १७ सप्टेंबरच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख व महत्त्वाच्या बांधवांची बैठक पार पडली. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील धनगर बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. परभणी येथील हा महामोर्चा सरकाराच्या उरात धडकी भरवणारा ठरेल आणि या आंदोलनाची ज्वाला राज्यभर पेटेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
Source link
धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी एल्गार:मोर्चा शासनाच्या उरात धडकी भरवणारा ठरणार, दीपक बोऱ्हाडे यांचा दावा