Headlines

बारवांचे पुनरुज्जीवन, स्वच्छता व संवर्धन ही काळाची गरज:श्रीकांत उमरीकर म्हणाले, मराठवाड्यात 8500 बारवांची दुरुस्ती आवश्यक




बारव आणि आड हे महाराष्ट्राच्या जलसमृद्ध संस्कृतीचे पारंपरिक जलस्रोत आहेत. सध्याच्या कमी पावसामुळे या ऐतिहासिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, स्वच्छता आणि संवर्धन करणे खूप महत्त्वाचे आहे, असे महाराष्ट्र शासनाच्या बारव संवर्धन समितीचे सदस्य श्रीकांत उमरीकर यांनी सांगितले. उमरीकर मराठवाडा पाणी परिषदेने आयोजित केलेल्या सहाव्या ‘जलमंथन’ बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ही बैठक छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामविकास भवन, एन-२, सिडको येथे झाली. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. जयसिंग हिरे, मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, जलतज्ज्ञ भीमराव मेश्राम आणि रवींद्र बोडखे उपस्थित होते. उमरीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुमारे २० हजार बारव आहेत, तर मराठवाड्यात त्यांची संख्या सुमारे ८ हजार ५०० आहे. या बारवांचे बांधकाम चालुक्य, यादव आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाले आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि वेरूळ लेणी यांसारख्या ठिकाणीही पावसाचे पाणी साठवण्याच्या जुन्या आणि यशस्वी पद्धती दिसतात. बारवांचे पाणी आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी पूर्वी बारवांमध्ये देवदेवतांच्या मूर्ती बसवल्या जात असत. लोकांच्या मनात देवदेवतांबद्दल असलेल्या आदरामुळे बारव आणि त्यांचा परिसर स्वच्छ राहील, हा त्यामागील सामाजिक उद्देश होता, असेही उमरीकर यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थनगर, अविष्कार कॉलनी, सातारा तसेच बिडकीन, चौंडाळा यांसारख्या परिसरात अनेक बारव आहेत. या बारवांची स्वच्छता, पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या कामाला अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे, असे उमरीकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. जयसिंग हिरे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये बारवांना खूप महत्त्व आहे. या ऐतिहासिक जलस्रोतांचा पर्यटनासाठी वापर केल्यास जलपर्यटन वाढू शकते. बारवांचे जतन केल्याने पाणी वाचेल, तसेच स्थानिक इतिहास, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा यांचेही रक्षण होईल. वेगवेगळ्या काळात आणि भौगोलिक परिस्थितीनुसार बारवांचे स्वरूप बदलले आहे, हे महाराष्ट्रातील विविध भागांतील बारवांचा अभ्यास केल्यास दिसून येते, असे डॉ. हिरे यांनी सांगितले. प्रास्ताविकात नरहरी शिवपुरे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील पाणी व्यवस्थापनात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बारवांची नोंदणी, स्वच्छता, पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जातील. या कामात मराठवाडा पाणी परिषद पुढाकार घेईल. या कार्यक्रमाला सय्यद नहेरी (आप), डॉ. जयप्रकाश बागडे, मीनाक्षी बिराजदार, भारती खरटमल, अशोक कोळी, संजय नागरे, बालाजी बिरादार यांच्यासह पाणी क्षेत्रातील अनेक अभ्यासक, संशोधक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *