![]()
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी धनकवडीतील ९ गणेश मंडळांनी एकत्र येत देशातील सर्वात मोठ्या संयुक्त मिरवणुकीचे आयोजन केले आहे. या वर्षी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता: फायदे आणि भविष्य’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. या मिरवणुकीचा शुभारंभ सोमवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गुलाबनगर येथे होणार आहे. जागतिक ख्यातीचे आयटी आणि एआय तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर आणि प्रख्यात एआय तज्ज्ञ डॉ. अमेय पांगारकर यांच्या हस्ते हा शुभारंभ होईल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली. या वर्षीच्या चित्ररथासाठी ‘कल्पना असेल जिथे एआय करेल चमत्कार तिथे’ आणि ‘माणसाची बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाची साथ, एआय बदलेल संपूर्ण जगातली वाट’ ही घोषवाक्ये वापरण्यात आली आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हा सध्याच्या तंत्रज्ञान युगातील एक महत्त्वाचा आणि वेगाने बदल घडवणारा घटक आहे. या शोभायात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गणेश भक्ताला एआयबद्दल माहिती दिली जाईल. ‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्यांचा’ या घोषवाक्यानुसार ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव कॉम्प्लेक्स मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक सोमवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. यात जवळपास ८ ते १० हजार गणेश भक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक मार्गे मोहनगर येथे पोहोचेल. यात ज्ञानप्रबोधिनी पथकही सहभागी होणार आहे. या मंडळांच्या सहकार्याने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही धनकवडीतील ९ गणेश मंडळांनी एकत्र येऊन मिरवणुकीचा उपक्रम यशस्वी केला होता. त्याच परंपरेला पुढे नेत या वर्षीही ही मिरवणूक यशस्वी करण्याचा संकल्प मंडळांनी केला आहे.
Source link
धनकवडीत 9 गणेश मंडळांची देशातील पहिली संयुक्त मिरवणूक:'कृत्रिम बुद्धिमत्ता' संकल्पनेवर आधारित चित्ररथ; 14 सप्टेंबरला शुभारंभ