Headlines

मोझरी बायपासवर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण अभियंत्याचा मृत्यू:नागपूरचा उत्कर्ष मेश्राम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घरी परतत होता




अमरावतीहून नागपूरकडे जाताना मोझरी बायपासवर एका रस्ता अपघातात एका तरुण स्थापत्य अभियंत्याचा मृत्यू झाला. हा अपघात आज, शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी झाला. मृत अभियंत्याचे नाव उत्कर्ष संदीप मेश्राम (वय २३, रा. नारा-नारी, नागपूर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष एमएच ४९ बीएक्स ४६३६ या क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरकडे जात होता. मोझरी बायपासवर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उत्कर्षने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होता. पुण्यातील चांगली नोकरी आणि करिअरची संधी असतानाही उत्कर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते, नागपूरच्या दिशेने जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा आवाज आला. मात्र, त्यावेळी अनेक ट्रक अमरावतीच्या दिशेने जात असल्याने धडक कोणत्या वाहनाने दिली, हे स्पष्ट झाले नाही. अपघातानंतर धडक देणारे वाहन वेगाने घटनास्थळावरून निघून गेले. माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक कार्यवाही करण्यात आली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवघ्या २३ व्या वर्षी स्थापत्य अभियंता म्हणून करिअर सुरू केलेल्या उत्कर्षने पुण्यातील नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढील ध्येय गाठण्याचे स्वप्न पाहिले होते. तो याच तयारीसाठी नागपूर येथील घरी परत जात होता. मात्र, नागपूरकडे परतण्याचा हा प्रवास त्याचा अखेरचा प्रवास ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *