![]()
जलसंपदा विभागातील निवृत्त स्थापत्य अभियंता अशोक पाटील (परतवाडा) यांनी आपल्या छंदातून ३० हजार बातम्यांचे संकलन केले आहे. यामध्ये अचलपूरची बंद पडलेली शकुंतला रेल्वे आणि चांगल्या कामगिरीने अनेक दशके वर्चस्व गाजवलेल्या विदर्भ मिलच्या (सध्याचे नाव फिनले मिल) समस्येपासून ते उंच झेप घेणाऱ्या स्थानिक यशोगाथांपर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या या बातम्यांची दोन दिवसीय प्रदर्शनी सुबोध हायस्कूलमध्ये भरवण्यात आली. त्यामुळे हा संग्रह समाजासमोर आला. या दोन दिवसीय विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन एसडीओ बळवंत अरखराव यांच्या हस्ते झाले. सुबोध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भारतीय अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वृत्तपत्र व माध्यम अधिस्वीकृती समितीचे अमरावती विभागाचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड, गटशिक्षणाधिकारी मयूर यादव, सुबोध शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजन पितळे, संचालक श्याम क्षीरसागर, पत्रकार जितेंद्र रोडे, मुख्याध्यापिका मीनाक्षी कुळकर्णी, पर्यवेक्षिका अंजली शुक्ला आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली हरदास उपस्थित होत्या. मान्यवरांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या की, ही प्रदर्शनी म्हणजे मोठी बौद्धिक मेजवानी आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी अभ्यासाचे नवे दालन आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि अनेकांना वैचारिक प्रेरणा मिळेल. ही प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. छंदामुळे कल्पनाशक्ती आणि बुद्धीला चालना मिळते. या साहित्याचे जतन करण्यासाठी शासनाने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा. पाहुण्यांचे स्वागत एनसीसीच्या पथसंचलनाने, शारदास्तवन आणि स्वागतगीताने झाले. शहीद स्मारकाच्या प्रतीकासोबत संत गाडगे महाराज, बाळशास्त्री जांभेकर आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजनही यावेळी झाले. प्रास्ताविक जितेंद्र रोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन कलाध्यापक हरिश फुटनाईक यांनी केले. सुरुवातीला विशाल श्रीनाथ यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सुरजुसे, मंदार भारतीय, गजानन कावलकर, वैभव भारतीय, मिलिंद क्षीरसागर, मोनू सुळे आणि किशोर वडतकर यांनी मेहनत घेतली. अशोक पाटील यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून हा छंद जोपासला आहे आणि ६८ व्या वर्षीही तो सुरू आहे. अध्ययन समाचार आणि सुबोध हायस्कूलच्या पुढाकारामुळे त्याचे प्रदर्शनात रूपांतर झाले. यात ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींची कात्रणे आहेत. गेल्या पाच दशकांतील महत्त्वाच्या घटनांचा हा संग्रह अनेकांना आश्चर्यचकित करून गेला. या संग्रहामुळे अशोक पाटील यांच्या रूपाने अचलपूरसारख्या ऐतिहासिक शहराचा वारसाही समोर आला.
Source link
सेवानिवृत्त अभियंत्याने 30 हजार बातम्यांचा संग्रह केला:यात शकुंतला रेल्वे, फिनले मिलपासून अनेक यशोगाथांचा समावेश