Headlines

डॉ. पंजाबराव देशमुखांचे शिक्षण व सामाजिक समतेतील योगदान प्रेरणादायी:प्राचार्य डॉ. संजय खडसे यांचे व्याख्यानात प्रतिपादन




महागाव येथील राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खडसे यांनी म्हटले की, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण व सामाजिक समतेतील योगदान आजही समाजाला दिशादर्शक आहे. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून, सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम आहे, या व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी ते ग्रामीण, वंचित आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचवले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा येथील श्री. पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयात ‘शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. खडसे बोलत होते. पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश कासांडे अध्यक्षस्थानी होते. डॉ. खडसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्याचा सामाजिक व ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केला. त्यांच्या काळात शिक्षणाच्या संधी समाजातील काही घटकांपुरत्याच मर्यादित होत्या. त्यामुळे बहुजन, मागासवर्गीय, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाऊसाहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पुण्यातील शिक्षण आणि तत्कालीन सामाजिक-राजकीय चळवळीतील नेत्यांचा सहवास यामुळे त्यांच्या विचारविश्वाची जडणघडण झाली. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. भारतात परतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कृषक समाज, सहकारी संस्था, कृषी खरेदी-विक्री व्यवस्था आणि कृषी विकासाशी संबंधित उपक्रमांना चालना दिली. खते, बियाणे, कृषी औजारे आणि कृषी उद्योग यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. “शिक्षण आणि कृषी विकास यांची सांगड घातल्याशिवाय ग्रामीण समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही,” हा त्यांच्या कार्यामागील व्यापक विचार होता, असेही डॉ. खडसे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश कासांडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण घेताना सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून समाजाच्या विकासासाठी योगदान देणे हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. या व्याख्यानातून शिक्षण, सामाजिक समता, शेतकरी सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्माण या चारही क्षेत्रांचा परस्परसंबंध दिसून आला. त्यामुळे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी वैचारिकदृष्ट्या प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीव समृद्ध करणारा ठरला. प्रास्ताविक अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. दयानंद झिंजुर्डे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *