![]()
घाटी रुग्णालयात श्वानदंशग्रस्त (कुत्रा चावलेल्या) रुग्णांसाठी १५०० ए.आर.एस. (अँटी रेबीज सिरम) लसींचा साठा मिळाला आहे. एनएबीएल अहवालासह हे डोस उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा आगामी महिनाभरासाठी लसीकरणाचा खर्च वाचणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातून दररोज सरासरी ५० ते ६० श्वानदंशाचे रुग्ण घाटी रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाटीत रेबीज लस उपलब्ध नव्हती. यामुळे गरीब आणि सामान्य रुग्णांचे खूप हाल होत होते. रुग्णांना नाईलाजाने बाहेरील खाजगी मेडिकल दुकानांमधून महागडे इंजेक्शन खरेदी करावे लागत होते. त्यामुळे श्वानदंशाच्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक फटका बसत होता. आता घाटी प्रशासनाने जळगावमधून एनएबीएल चाचणी अहवालासह १५०० एआरएस लस हस्तांतरित केली आहे. गुणवत्ता चाचणी पूर्ण होऊन ही लस दाखल झाल्यामुळे रुग्णांना तात्काळ आणि मोफत डोस देणे शक्य होणार आहे. मनपा आणि घाटी यांच्यात ही लस कोणी द्यायची यावरून वाद सुरू होता. घाटी प्रशासनाने मनपाला एआरएस लस देण्याबाबत पत्रही पाठवले होते. मात्र, मनपाकडून त्यावर कोणताही तोडगा काढला नाही. अखेर घाटीनेच यावर पुढाकार घेऊन तोडगा काढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्रा चावल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कुत्रा चावल्यानंतर गंभीर स्थिती झाल्यास एआरएस हे इंजेक्शन घ्यावे लागते. हे इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना ते बाहेरून खरेदी करावे लागत होते. आता हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची भटकंती थांबणार आहे.
Source link
घाटी रुग्णालयात १५०० रेबीज लसींचे डोस दाखल:रुग्णांना मोफत उपचार मिळणार, मनपा-घाटी वादामुळे थांबलेला खर्च वाचणार