Headlines

मानाच्या 5 गणपतींची प्रतिष्ठापना:पुणेकर बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, ढोल-ताशांच्या गजरात निघणार भव्य मिरवणुका




पुण्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या आगमनाचा जल्लोष रंगणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतींच्या आगमन मिरवणुका व प्राणप्रतिष्ठा सोहळे होतील. ढोल-ताशा पथके, बँड पथके, पारंपरिक वाद्ये आणि आकर्षक रथांमुळे मध्यवर्ती पुणे गणेशमय होईल. मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी ९ वाजता उत्सव मंडपातून निघणार आहे. सकाळी ११.४५ वाजता प्राणप्रतिष्ठा होईल. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता चांदीच्या पालखीतून निघणार असून, विविध वाद्य पथकांचा सहभाग असेल. दगडूशेठचा मयूर रथ ठरणार मोठे आकर्षण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या १३४ व्या वर्षी यंदा वृंदावन येथील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजता फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून गणरायाची आगमन मिरवणूक निघणार आहे. गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड सहभागी होतील. सकाळी ११.११ वाजता उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन होईल. भाऊसाहेब रंगारींच्या बाप्पाची सव्वाआठ वाजता मिरवणूक हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आगमन मिरवणूक सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजता निघणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता मार्गे मिरवणूक गणेश सुवर्णधाम येथे पोहोचेल. या मिरवणुकीत श्रीराम, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्र गर्जना आणि केशव शंखनाद या ढोल पथकांचा सहभाग राहणार आहे. शेषशायी विष्णूची मूर्ती शिव-विष्णू समन्वयाचे दर्शन अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. सकाळी १० वाजता फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. समर्थ आणि तालचक्र ढोल पथकांसह न्यू गंधर्व बँड सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता डॉ. विनय थोरात व प्रतिभा थोरात यांच्या हस्ते हरिहर मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. यंदा मंडळाने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकात्मतेचे प्रतीक असलेले भव्य हरिहर मंदिर उभारले आहे. ९० बाय ६० फूट मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर फायबरमध्ये साकारण्यात आले आहे. शेषशायी विष्णूची मूर्ती आणि शिवपिंडीसह शिव-विष्णू समन्वयाचे दर्शन या सजावटीतून घडणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *