Headlines

करमाळ्यात आरक्षणाचे उपवर्गीकरण, नागरिकत्व व शिक्षण व्यवस्थेवर मंथन:जागे असलेल्या मुंगीत झोपलेल्या हत्तीपेक्षा जास्त ताकद असते- कमलाकांत काळे‎




आरक्षणाच्या उपवर्गीकरणा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची संविधानिकता व वैधता याबाबतही त्यांनी आपले विचार मांडले. तसेच बहुजन समाजाने आपल्या हक्कांसाठी जागरूक राहून संघटितपणे संघर्ष करण्याची गरज असल्याचे कमलाकांत काळे म्हणाले. करमाळ्यात रविवारी युनिटी ऑफ मूलनिवासी समाजाचे तिसरे राज्य अधिवेशन पार पडले. यावेळी काळे बोलत होते. एसआयआर, एनपीआर, एनआरसी आणि सीएए, नागरिकत्वाचा प्रश्न तसेच मूलनिवासी समाजासमोरील संभाव्य आव्हाने या विषयांवर अधिवेशनात मंथन करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी), नीट-सीईटी, टीईटी परीक्षा, मूल्यांकन पद्धतीतील त्रुटी, उच्च शिक्षणाचे बाजारीकरण आणि पेपर लीकच्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवरही विचार मांडले. तसेच राष्ट्राच्या पुनर्निर्माणात विद्यार्थी, तरुण आणि महिलांचा सहभाग वाढवणे, संघटनात्मक नैतिकता जपणे आणि सामाजिक परिवर्तनासाठी विविध स्तरांवर काम करणे, यावरही अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाचे उद्घाटन विद्रोही कवी वामनदादा कर्डक यांचे नातू संदेश संभाजी कर्डक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी युनिटी ऑफ मूलनिवासी समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे होते. अध्यक्षीय भाषणात कमलाकांत काळे म्हणाले, “जागे असलेल्या मुंगीमध्ये झोपलेल्या हत्तीपेक्षा जास्त ताकद असते,” असे सांगत जागरूकता आणि संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रत्येक माणसाने आपल्या मुलांना संघर्षाचे उदाहरण देण्यासाठी दुसऱ्याचे उदाहरण सांगावे लागू नये, एवढा तरी संघर्ष केला पाहिजे, असा संदेश दिला. त्यांनी ‘जाती जनगणनेसोबत धोकेबाजी आणि बहुजन प्रतिनिधित्वावर वाढते घटनात्मक संकट’ या विषयावर सविस्तर विचार मांडले. आगामी जाती जनगणनेची अवस्था २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेप्रमाणे (एसईसीसी) होणार आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी जाती जनगणनेतील संभाव्य अडचणी आणि बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वासमोरील प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश कुमार, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मान तांबोळी, सोपान ढाणे, पैगंबर शेख, प्रदेशाध्यक्ष अजित खरसडे, लाँग मार्च बीडचे संयोजक अजय सरवदे व सिद्धार्थ शिनगारे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर, आरक्षण दिनाच्या शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त तसेच महाड मुक्ती रणसंग्रामाच्या शताब्दी वर्षानिमित्त युनिटी ऑफ मूलनिवासी समाज महाराष्ट्राचे तिसरे राज्य अधिवेशन रविवारी करमाळा येथील नालबंद मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. प्रा. हरी नरके व डॉ. गेल ऑमव्हेट यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आलेल्या या अधिवेशनात जाती जनगणना, बहुजन प्रतिनिधित्व, आरक्षणाचे उपवर्गीकरण, नागरिकत्व आणि शिक्षण व्यवस्थेसह विविध सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. पोवाड्यातून प्रबोधन कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्र शिवशाहीर राजेंद्र कडूसकर यांनी प्रबोधनपर पोवाडा सादर केला. पोवाड्याच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मान्यवरांनी विविध विषयांवर आपली मनोगते व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *