Headlines

चिस्ती हैद्रा दर्ग्यासाठी अन्नछत्रतर्फे सौरऊर्जा:अक्कलकोट शहरात ऑक्टोबरमध्ये लोकार्पण‎




अक्कलकोट स्टेशन लाखो भाविकांचे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थानासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्च येणार असून, अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकीतून हा संपूर्ण खर्च उचलला आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, येत्या आठ दिवसांत ते पूर्ण होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती हैद्रा देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष रफिक मुजावर यांनी दिली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दर्गा व्यवस्थापनाच्या विनंतीची तत्काळ दखल घेत या सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली. हैद्रा देवस्थान येथे दरमहा सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल येत असल्याने देवस्थानच्या व्यवस्थापनावर मोठा आर्थिक भार पडत होता. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या खर्चात मोठी बचत होऊन देवस्थानच्या अन्य धार्मिक व सामाजिक कामांसाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पासाठी नागनहळळी आश्रमशाळेचे सचिव जावेद पटेल यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांची भेट घेऊन देवस्थानच्या वाढत्या वीजखर्चाबाबत माहिती दिली होती. त्यांच्या विनंतीनुसार अन्नछत्र मंडळाने हा संपूर्ण खर्च उचलत देवस्थानला मोठी मदत केली आहे. या कामासाठी उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर, सचिव वकील मुजावर यांनीही परिश्रम घेतले असून देवस्थानच्या वतीने अन्नछत्र मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. या मदतीमुळे भविष्यातील वीजखर्चाचा मोठा भार कमी होणार असून सर्वधर्मीय सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *