Headlines

बाप्पा येतोय..भक्तीचा जल्लोष, सुरक्षेचा बंदोबस्त!:शहरात 272 मंडळांसह घरोघरी आज ‘श्रीं’चे आगमन; 492 समाजकंटकांवर तडीपारीची कारवाई‎


.

अहिल्यानगर शहरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. २७२ सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी सोमवारी गणरायांचे उत्साहात आगमन होणार आहे. गणेशमूर्ती, मखर, सजावट व पूजासाहित्याच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली. अबालवृद्धांसह महिला गौरी-गणपतीच्या स्वागताच्या तयारीत मग्न होत्या. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दक्षतेचा भाग म्हणून ४९२ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक तडीपारीची कारवाई केली. शहर व उपनगर भागात गणेशमूर्ती, सजावट आणि पूजासाहित्याचे शेकडो स्टॉल उभारण्यात आले आहेत. माळीवाडा, कल्याण रोड, प्रोफेसर चौक, कुष्ठधाम व पाइपलाइन रोड, केडगाव परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. आजची गर्दी लक्षात घेऊन अनेक भक्त व मंडळांनी रविवारीच गणेशमूर्तींची खरेदी केली. ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सोमवारी सकाळी ९.३० वाजता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही बाप्पांच्या स्वागतासाठी मिरवणुकीची तयारी केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’व मनपाने केले होते. विविध शाळांत कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात त्याचा परिणाम म्हणून यंदा शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. ‘दिव्य मराठी’ ने जिल्ह्यात २२ कार्यशाळा घेतल्या, त्यामाध्यमातून सुमारे ८ हजार घरांत मातीचे गणपती विराजमान होणार आहेत.

माळीवाड्यात मॉक ड्रिल; ३२८ पोलिसांचा बंदोबस्त गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी ४९२ जणांवर एक दिवसाच्या तडीपारीची कारवाई, तर ३८३ जणांकडून बंधपत्र घेण्यात आले. बेकायदा दारूविक्रीप्रकरणी २१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, चार सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शहरात सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात येत असून, रूट मार्चसह माळीवाड्यात मॉक ड्रिल घेण्यात आली. संवेदनशील व मिश्र वस्त्यांमध्ये १८ अधिकारी, १७५ अंमलदार आणि १३५ होमगार्ड असा ३२८ जणांचा बंदोबस्त तैनात असल्याचे पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले. उत्सव काळात संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

तारकपूर येथील श्रीराम मित्र मंडळाच्या ‘तारकपूरचा राजा’ या १५ फुटी मोदकावर विराजमान बाप्पांचे ढोल – ताशांच्या गजरात आगमन झाले. छाया : राजू खरपुडे गणेशमूर्ती, मखर, सजावट व पूजा साहित्य खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *