![]()
तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (दि. १२) तान्हापोळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी बालशेतकऱ्यांची वेशभुषा साकारत मातीच्या बैलजोड्यांना आकर्षक पध्दतीने सजविले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवणगावचे माजी सरपंच केशव कविटकर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कोवळे तसेच सहायक शिक्षिका डॉ. वंदना धवने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवणगाव येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या आनंदात भर पडावी, या उद्देशाने संस्थेने विविध उपक्रम राबविले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंकुश दरेकर, उपाध्यक्ष अभिषेक चव्हाण, सचिव प्रतिक रावेकर, कोषाध्यक्ष राहुल आठवले तसेच चेतन डिवरे, किशोर खांडेकर, ऋषिकेश वानखडे, अजिंक्य सोनोने, गजानन भुरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच पालक आणि मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सजविलेल्या बैलजोड्यांचे बारकाईने निरीक्षण करून क्रमांक निश्चित करण्यात आले. उत्कृष्ट सजावट व सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून त्यांचा आनंद व्दीगुणित करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला. तान्हापोळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवन आणि बैलांप्रती असलेले प्रेम यांची ओळख करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
Source link
तान्हापोळ्यात सहभागी झाले चिमुकले:विद्यार्थी शिवणगावच्या जि.प. शाळेत ‘सर्वोदय’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांंची उपस्थिती