Headlines

विदर्भात वाघ-मानव संघर्ष तीव्र:टबने हल्ला परतवत शेतकऱ्याने वाचवला जीव, तर बचावासाठी युवक 12 तास झाडावर




गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वाघाच्या दोन धक्कादायक हल्ल्यांच्या घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका घटनेत शेतकऱ्याने अफाट प्रसंगावधान दाखवत प्लास्टिकच्या टबाने वाघाचा प्रतिकार करून स्वतःचे प्राण वाचवले, तर दुसऱ्या घटनेत एका युवकाने तब्बल 12 तास झाडावर बसून मृत्यूला हुलकावणी दिली. दरम्यान, शेजारील वर्धा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला असून विदर्भात वाघ-मानव संघर्षाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पहिली घटना गडचिरोली तालुक्यातील पोरला येथे घडली. शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. वाघ अंगावर येताच शेतकऱ्याने न घाबरता हातात असलेल्या प्लास्टिकच्या टबाने वाघावर जोरदार प्रतिकार केला. या झटापटीत शेतकरी जखमी झाला असला, तरी त्याच्या या आक्रमक प्रतिकारामुळे वाघाने अखेर जंगलात पळ काढला. दुसरी घटना एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली जंगलात घडली. शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका युवकासमोर अचानक वाघ आला. वाघाला पाहताच युवकाने क्षणाचाही विलंब न करता जवळच्या झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, वाघ झाडाखालीच ठाण मांडून बसला आणि रात्रभर झाडाभोवती घिरट्या घालत राहिला. युवकाने धीर न सोडता संपूर्ण रात्र झाडावरच काढली. अखेर पहाटेच्या सुमारास वाघ जंगलात निघून गेल्यानंतर 12 तासांनी युवकाने खाली उतरून सुटकेचा श्वास घेतला. वर्ध्यात शेतकऱ्याचा बळी दुसरीकडे, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रायपूर जंगली येथे शेतात काम करणाऱ्या भगवान धुर्वे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाची वाहने अडवून रास्ता रोको केला. तसेच आमदार आणि पालकमंत्र्यांनी घटनास्थळी येऊन ठोस आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. खासदार अमर काळे आणि काँग्रेस नेते अभ्युदय मेघे यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र वन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळाला. गडचिरोली आणि वर्ध्यात घडलेल्या या घटनांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, वन विभागाने तातडीने या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *