![]()
लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण काढली. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. डॉ. गोपाळराव पाटील हे मूळचे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेक रुग्णांना आधार दिला. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी ते ‘देवदूत’ ठरले होते. उपचार करताना केवळ व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता समाजसेवेची भावना जपणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्त्वाचा आधार आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाला राज्यातच नव्हे, तर देशभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा जागतिक स्तरावर झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आणि गुणवत्तेच्या बाबतीत मागे राहू नये, यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांच्या निधनामुळे लातूरच्या शैक्षणिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘डॉ गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या क्षेत्रातील नवनवीन संशोधन, ज्ञान तंत्रज्ञानाचा रुग्णांना लाभ व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. लातूरला शिवछत्रपती शिक्षण संस्था स्थापन करून, त्याअंतर्गत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने डॉ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या जोरावर देशभरात ओळख निर्माण केली. डॉ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभा सदस्यत्वाची संधी मिळाली. राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे या महत्त्वाच्या विषय समित्यांवर काम केले. डॉ पाटील यांनी महाराष्ट्राच्या समाजकारण – राजकारणात निस्पृहपणे कार्य करण्याचा मानदंड निर्माण केला. त्या अर्थाने ते निरंतर सेवाव्रती होते. डॉ पाटील यांच्या निधनाने राज्याच्या वैद्यकीय सेवा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. पाटील कुटुंबीयांसह, त्यांच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला – शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून जनसेवा करतानाच, शिक्षणाचे महत्त्व ओळखून लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील राजर्षी शाहू महाविद्यालयाने ‘लातूर पॅटर्न’च्या माध्यमातून राज्याला आणि देशाला अनेक गुणवंत विद्यार्थी दिले. लातूरची शैक्षणिक ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वपूर्ण समित्यांवर आपल्या अभ्यासू वृत्तीचा ठसा उमटवला. एक मृदूभाषी, संयमी आणि विकासाची दृष्टी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनामुळे आपण एका मार्गदर्शकाला मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! विनम्र अभिवादन!
Source link
लातूरचा आधारवड कोसळला! माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन:‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; शिक्षणविश्वात शोककळा