Headlines

वर्ध्यात खासदाराचे 6 दिवसांपासून उपोषण:वाघहल्ल्यातील पीडित कुटुंबासाठी आंदोलन, रोहित पवारांची भेट




सेलू तालुक्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेले आंदोलन सहाव्या दिवशीही कायम आहे. कुटुंबीयांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने धुर्वे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत कुटुंबीयांची भेट घेतली. भगवान धुर्वे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मदत मिळावी, तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खासदार अमर काळे हे देखील गेल्या सहा दिवसांपासून कुटुंबीयांसोबत आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले असून प्रशासनावर मागण्या मान्य करण्यासाठी दबाव वाढला आहे. रोहित पवार आंदोलनस्थळी आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी रायपूर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मागण्यांवर चर्चा सुरू आहे. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अपेक्षित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन दरम्यान, जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली होती. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावातील परिस्थिती सुधारण्यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामस्तरीय समिती, स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी प्रशासन सातत्याने संवाद साधत असून, ग्रामस्थांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाकडून कुटुंबातील एका व्यक्तीला कंत्राटी वाहनचालक किंवा वनमजूर म्हणून रोजगार देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. अंत्यसंस्कार करण्याचे प्रशासनाचे आवाहन मृतदेहावर दीर्घकाळ अंत्यसंस्कार न झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कुटुंबीय आणि ग्रामस्थांना अंत्यविधी लवकर करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या परमानंद काठरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या 1989 मधील निकालाचा संदर्भ देत मृत व्यक्तीच्या सन्मानाचाही विचार होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांना सांगितले आहे. मात्र, कुटुंबीय आणि ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असून, मागण्यांवर समाधानकारक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पत्रकार परिषदेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी आंदोलन आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा सुरू असल्याचे सांगत अंत्यसंस्कार लवकर करून घेण्याचे आवाहन केले होते. पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, बोर अभयारण्याचे उपसंचालक मंगेश ठेंगडी आणि उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी उपस्थित होते. मात्र, प्रशासनाकडून मदत आणि उपाययोजनांबाबत आश्वासने देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू आहे. आता रोहित पवार यांच्या भेटीनंतर या आंदोलनाला आणखी राजकीय पाठिंबा मिळाला असून, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील चर्चेत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त करता येणार:हायकोर्टाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा शाळा सोडल्यानंतर शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात झालेली चूक दुरुस्त करता येत नाही, अशी अनेक विद्यार्थ्यांची समजूत असते. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही नियमानुसार दुरुस्त करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *