Headlines

पेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची 24 लाखांची फसवणूक:पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल; ऑनलाइन टास्कच्या नावाखाली तरुणालाही 4 लाखांचा गंडा




पेन्शन कार्ड देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २३ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील लेक टाऊन सोसायटीत राहणाऱ्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन कार्ड मिळणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले. गेल्या तीन ते चार दिवसांत या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात तब्बल २३ लाख ७८ हजार रुपये जमा केले. एवढे पैसे जमा केल्यानंतरही चोरट्यांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधून आणखी रक्कम भरण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे निरीक्षक एस. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची चार लाख ११ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संदेश पाठवून घरातून ऑनलाइन काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. ऑनलाइन काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे त्याला सांगण्यात आले. सुरुवातीला तरुणाला एक छोटे काम देण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यावर त्याला परताव्यापोटी काही रक्कम मिळाली. यामुळे तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला मोठी रक्कम गुंतवण्यास सांगितले आणि चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात चार लाख ११ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *