![]()
हिंगोली जिल्ह्यात एका बाजूला शेतकरी तीव्र दुष्काळ आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे संकटात सापडला असताना, दुसरीकडे पालकमंत्री विविध विकासकामांचे थाटामाटात उदघाटन व विकास कामांची पाहणी करीत असून त्याच्या याकृतीचा क्रांतीकारी शेतकरी संघटनेने तिव्र निषेध नोंदविला आहे. पालकमंत्र्याच्या विरोधात यापुढे तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हयात दुष्काळ सदृष्य परिस्थती आहे. मागील एक ंमहिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट येणार असून कापसाची वाढ खुंटली असल्याने पाते व बोंडे लागणे कठीण आहे. ज्या भागात पाते व बोंडे लागली त्या भागात उष्ण व दमट वातावरणामुळे पातेगळ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सेनगाव तालु्कयातील हाताळा व ताकतोडा परिसरात विकास कामांची पाहणी केली. एकीकडे जिल्हा दुष्काळाच्या खाईत असतांना पालकमंत्र्यांकडून विकास कामांची केली जाणारी पाहणी शेतकऱ्यांसाठी संतापाचा विषय बनली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी प्रतिक्रिया देत पालकमंत्र्याच्या या भुमीकाचा निषेध केला ओह. जिल्हयात दुष्काळजन्य परिस्थिती आणि शासनाकडून अपुऱ्या मदतीमुळे हवालदिल झालेल्या महिला शेतकरी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून व सरकारकडून योग्य मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना पीकविमा आणि दुष्काळी मदत मिळवून देण्याऐवजी ज्या कामांमध्ये कमिशन आणि टक्केवारी मिळते, त्याच कामांची उद्घाटने व पाहणी थाटामाटात केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकारचे उद्घटनांचे कार्यक्रम व विकास कामांची पाहणी कार्यक्रम तातडीने थांबवून सर्वप्रथम शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक तीव्र होईल, असा इशारा कावरखे व पतंगे यांनी दिला आहे.
Source link
हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतांनाही पालकमंत्र्यांकडून विकास कामांची पाहणी:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून निषेध, आक्रमक भुमीका घेण्याचा इशारा