![]()
हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे बहुप्रतीक्षित व्याख्यान अखेर अमरावतीत पार पडले. हे व्याख्यान १५ सप्टेंबर रोजी अमरावती विद्यापीठाने आयोजित केले होते. मात्र, सर्व तयारी अंतिम टप्प्यात असताना दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाने त्यांना व्याख्यानासाठी येऊ नका, असा संदेश पाठवला आणि दुसऱ्या वक्त्याची निवड केली. बंडगर महाराजांच्या मांडणीचा विषय ‘महाराष्ट्रातील समतावादी संत परंपरा व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी’ हा होता. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याने ‘बंडगर यांची मांडणी विद्यापीठाच्या सध्याच्या चौकटीत बसणारी नाही’ अशी भूमिका घेतली. यामुळे व्याख्यानाचे आयोजक असलेल्या महानुभाव अध्यासनाचे प्रमुख महंत सोनपेठकर बाबा यांना वक्ता बदलण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर ‘आम्ही अमरावतीचे लोकं’ या संस्थेने पुढाकार घेतला. त्यांनी अमरावती विद्यापीठाला ज्या संतांचे नाव आहे, त्याच संत गाडगेबाबांच्या मंदिरातील सभागृहात बंडगर महाराजांचे व्याख्यान आयोजित केले. या व्याख्यानाला अमरावतीकर नागरिकांनी मोठी गर्दी केली. संस्थेने म्हटले की, “समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीच्या ज्या वाटा आहेत, त्या बंद करण्याचा प्रयत्न करित असाल तर आम्ही महामार्ग उभा करू.” ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे संत साहित्याचे दाखले देत महानुभाव पंथाचे विचार सांगतात आणि सामाजिक समतेचा संदेश देतात. ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याख्यान पार पडले. महानुभाव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अनंतराव तेलखेडे आणि विचारवंत प्रा. दीपक पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्याख्यानात ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कार्याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला. त्यांनी महानुभाव तत्त्वज्ञान आणि विचारांविषयी माहिती दिली. तसेच वारकरी संप्रदाय आणि अमरावती जिल्ह्यातील गाडगेबाबा, गणपती महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि तुकडोजी महाराज यांचाही उल्लेख केला. अनंतराव तेलखेडे यांनी महानुभाव पंथाची भूमिका आणि इतिहासाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दीपक पवार यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ या विषयावर मांडणी केली. अध्यक्षीय भाषण चंद्रकांत वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक संदीप तडस यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात संदीप तडस, प्रकाश मानेकर, प्रदीप पाटील, आशिष कडू, नितीन चौधरी, पंकज आवारे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.
Source link
अमरावती विद्यापीठाने नाकारले तरी बंडगर महाराजांचे व्याख्यान:गाडगेबाबा मंदिरात झाले, 'समतावादी संत परंपरा' विषयावर नागरिकांची गर्दी