Headlines

शाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी शिक्षक प्रशासकीय कामात:विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची पालकांची चिंता




अमरावती प्रतिनिधी: शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक प्रशासकीय कामे अजूनही संपलेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पायाभरणी मजबूत करणे, मागे राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि वाचन, लेखन, गणितातील मूलभूत कौशल्ये विकसित करणे यावर परिणाम झाला आहे. यामुळे पालक, शिक्षक संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली असून, शासनाला यावर जाब विचारण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील शाळा ३० जूनपासून सुरू झाल्या आहेत. शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. या काळात शिक्षक कोणत्या विद्यार्थ्याला वाचनात मदत हवी आहे, कोणाला गणिताच्या मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत, कोणाला जास्त सराव हवा आहे आणि कोणाला वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे, याचा शोध घेऊन त्यावर काम करतात. मात्र, शाळा सुरू झाल्यावर काही दिवसांतच शिक्षक एसआयआरच्या कामात गुंतले. त्यानंतर विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन नोंदी, शिष्यवृत्ती, अहवाल, योजनांची माहिती आणि इतर प्रशासकीय कामे सुरूच राहिली. यामुळे शिक्षकांचा वेळ वर्गात शिकवण्याऐवजी कार्यालयीन कामांमध्ये खर्च होत आहे. कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. एखादा शिक्षक प्रशासकीय कामासाठी बाहेर गेल्यास, उरलेल्या शिक्षकाला वर्ग सांभाळायचा की स्वतःचे प्रशासकीय काम पूर्ण करायचे, असा प्रश्न पडतो. अनेक ठिकाणी एका शिक्षकाला दोन-तीन वर्ग सांभाळावे लागतात. अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वैयक्तिक लक्ष देणे किती शक्य आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक उपस्थित आहे की नाही, हे मोजण्याऐवजी शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष किती वेळ मिळाला, याचेही मूल्यमापन होणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे. यावर प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, विविध पोर्टल, सर्वेक्षणे, अहवाल आणि विभागीय कामांमध्ये शिक्षकांचा महत्त्वाचा वेळ खर्च होत आहे. शासन विविध विभागांची कामे शिक्षकांवर लादून त्यांच्या शिकवण्याचा वेळ हिरावून घेत आहे. शिक्षकांचा प्रत्येक तास विद्यार्थ्यांसाठी असतो. तो तास अशैक्षणिक कामात घालवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे, असेही सावरकर म्हणाले. विविध शिक्षक संघटना आणि शिक्षण कार्यकर्त्यांकडून गेल्या अडीच महिन्यांतील अध्यापनाच्या वेळेचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *