Headlines

ग्रामीण पोलिसांनी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई:कुऱ्हा आणि दत्तापूरमध्ये 1600 लिटर मोह सडवा, 1.61 लाखांचे साहित्य नष्ट




अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. कुऱ्हा आणि दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी छापे टाकण्यात आले. पोलिसांनी मोह्याचा १,६०० लिटर सडवा, युरिया खत आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या या साहित्याची एकूण किंमत सुमारे १ लाख ६१ हजार ६५० रुपये आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीतील घरफोडी, चोरी आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा शेतशिवारात मोहन वानखेडे यांच्या शेताजवळ नाल्याच्या काठी सुभाष दादाराव वानखेडे (वय ४५, रा. जुना धामणगाव, जि. अमरावती) हा गावठी हातभट्टीची दारू तयार करत होता. पोलिसांनी छापा टाकताच आरोपी साहित्य सोडून पळून गेला. घटनास्थळावरून ९०० लिटर मोह सडवा, २ किलो दाणेदार युरिया खत आणि दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ९० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत, दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर शेतशिवारात नाल्याच्या काठी रवींद्र भाऊराव पडघाम (रा. जुना धामणगाव) हा हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे पोलिसांना दिसले. मात्र, पोलीस दिसताच आरोपी पळून गेला. तेथून ७०० लिटर सडवा, ३ किलो युरिया खत आणि इतर साहित्य असा एकूण ७० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम १२३, २७४, २७५ सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहित कुराळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय प्रधान, जमादार चेतन दुबे, गजानन ठाकरे, सुधीर बावणे आणि सचिन गायधने यांचा समावेश होता. दोन्ही ठिकाणांवरून सडव्याचे नमुने सीलबंद करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, जप्त केलेला १,६०० लिटर नाशवंत सडवा पंचांसमक्ष घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *