Headlines

पिंपळगाव निपाणीच्या जि.प. शाळेला शिक्षक मिळाले:रिक्त जागेवर प्रेरणा पेठे यांची नियुक्ती, पाठपुराव्याला यश




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत अखेर शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या सहायक शिक्षिका पदावर प्रेरणा जयंत पेठे यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. पिंपळगाव निपाणीच्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यातच शिक्षकाचे पद रिक्त झाल्याने शाळेवरील शैक्षणिक ताण आणखी वाढला होता. याची गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यांनी रिक्त जागेवर तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली. मात्र, निवेदनानंतरही सुमारे २० दिवस कोणतीही कार्यवाही न झाल्याने ८ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह त्यांनी पुन्हा जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने रिक्त पदावर तात्काळ शिक्षक नियुक्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर सहायक शिक्षिका म्हणून प्रेरणा जयंत पेठे यांची नियुक्ती केली. शिक्षिका नियुक्त झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, पालक आणि ग्रामस्थांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, शिक्षक नियुक्तीचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. शाळेतील उर्वरित शैक्षणिक अडचणींकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा संदेश ढोके यांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *