Headlines

शिंदेंचे नेते मोदी-शहा, बाळासाहेब नव्हे!:कॅबिनेटमध्ये जरांगेंना शिव्या घालून पहाटे पायाशी का गेलात?; संजय राऊतांचा हल्लाबोल




“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हा मुळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच पक्ष आहे. आमचे मुख्यालय दादरचे शिवसेना भवन आणि ‘मातोश्री’ आहे, तर त्यांच्या पक्षाचे मुख्यालय अहमदाबादला आहे. त्यामुळे आपल्या पक्षप्रमुखांना मुजरा करण्यासाठी शिंदे थेट गुजरातला गेले आहेत,” असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा गुजरात दौरा, मराठवाड्यातील 760 अपूर्ण आश्वासने, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सरकारची दुटप्पी भूमिका आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मिळालेल्या नोटीसवर सविस्तर व आक्रमक भूमिका मांडली. पंतप्रधानांचा देश गुजरातपुरताच मर्यादित; शिंदेंची शिवसेना भंपक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या वडनगर दौऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस असताना त्यांनी देशाच्या राजधानीत (दिल्लीत) उपस्थित राहणे गरजेचे होते, जेणेकरून देशभरातील लोक त्यांना भेटू शकतील. परंतु पंतप्रधान मोदींच्या डोक्यात ‘माझा देश भारत’ नसून ‘माझा देश गुजरात’ असाच विचार आहे. त्यांचा देश केवळ गुजरातपुरताच मर्यादित आहे.” बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणे ढोंग “गुजरातमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजराती भाषेत भाषण केले आणि गुजरातीतून जाहिराती दिल्या. यावरून सिद्ध होते की, त्यांची शिवसेना ही खोटी आणि भंपक आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार म्हणवणारे शिंदे प्रत्यक्षात मोदी आणि शहा यांचेच मांडलिक आहेत. त्यांचे खरे नेते बाळासाहेब नसून मोदी-शहा आहेत, हे त्यांनी स्वतःच सिद्ध केले आहे.” मराठवाड्याला 760 आश्वासने दिली, पूर्ण एकही नाही; मुख्यमंत्र्यांवर टीका उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आंदोलनाला ‘नाकर्त्यांचे आंदोलन’ म्हटले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले, “नाकर्ते कोण हे मराठवाड्याची जनता चांगलेच ओळखून आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त, कर्जमुक्त आणि महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करण्याची वारंवार पोकळ आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात काय झाले? शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत.” 760 आश्वासने कागदावरच “संभाजीनगरमध्ये वारंवार कॅबिनेट बैठका घेऊन मराठवाड्याला तब्बल 760 आश्वासने दिली गेली. मात्र त्यातील 1 टक्काही काम प्रत्यक्षात उतरले नाही. म्हणूनच अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ‘तुमसे ना हो पायेगा’ असा एल्गार पुकारला असून त्याला उद्धव ठाकरेंचे खंबीर पाठबळ आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर आता महाराष्ट्रात कोणीही विश्वास ठेवत नाही.” कॅबिनेटमध्ये जरांगेंविरोधात बोलता आणि पहाटे पायाशी जाता? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थगितीच्या घटनाक्रमावर राऊत यांनी सरकारची पोलखोल केली, “कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी जरांगे यांच्या भाषेवरून संताप व्यक्त केल्याची आणि त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा रंगली होती. मग कॅबिनेटमध्ये जरांगेंना दूषणे देणारे हेच मंत्री पहाटे 5 वाजता जाऊन त्यांच्या पायाशी का बसले?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. “जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकारचे धाबे दणाणले होते. प्रकरण अंगलट आल्याचे दिसताच हे लोक रातोरात बीडला जाऊन जरांगेंच्या दारात उभे राहिले. सरकारचे हे वागणे अत्यंत लाचार आणि दुटप्पी आहे.” सरकारने जबाबदारी पार पाडावी जरांगे यांनी उपोषण स्थगित करून सरकारला ९० दिवसांची (३ महिन्यांची) मुदत दिली आहे. १८-१९ दिवस उपोषणाला बसलेल्या जरांगेंची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; परंतु आता सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, ही संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे. दिशा सालियन नोटीस- 500 कोटींची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित; कायदेशीर व राजकीय उत्तर देऊ दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या 500 कोटींच्या मानहानीच्या नोटीसवर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले. “8 ऑगस्ट 2020 रोजी त्या मुलीच्या वडिलांनी जे मत मांडले होते, ते सर्वांना माहीत आहे. आता इतक्या वर्षांनंतर अचानक त्यांचे मतपरिवर्तन कसे झाले? यामागे कोणाची राजकीय ताकद काम करत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला स्पष्ट दिसत आहे.” आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे षडयंत्र “ही 500 कोटी रुपयांची नोटीस निव्वळ ‘पॉलिटिकली मोटिव्हेटेड’ (राजकीय हेतूने प्रेरित) आहे. निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे.” “आम्ही या षडयंत्राला घाबरत नाही. आदित्य ठाकरेंच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे. ही लढाई राजकीय असेल तर राजकीय मैदानात लढू आणि कायदेशीर असेल तर न्यायालयातही पूर्ण ताकदीने कायदेशीर लढा देऊ,” असा सज्जड इशारा संजय राऊत यांनी दिला. ——– हेही वाचा दिशा सालियन प्रकरण, 500 कोटींच्या अब्रुनुकसानीचा इशारा: आदित्य ठाकरे-अनिल देशमुखांना सतीश सालियान यांची कायदेशीर नोटीस; 7 दिवसांत बिनशर्त जाहीर माफी मागा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता मोठे कायदेशीर आणि राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत दोघांनीही सर्व प्रमुख वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतून बिनशर्त जाहीर माफी मागावी, अन्यथा 500 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असा सज्जड इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *