![]()
खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी) मध्ये उपचार घेत असलेल्या सुमारे ४५ सैनिकांना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभव घेता आला. यामुळे प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहता येत नसतानाही बाप्पासमोर उभे असल्याचा अनुभव सैनिकांना मिळाला. हा उपक्रम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या सहकार्याने पुणेस्थित तंत्रज्ञान कंपनी क्यूबिटने राबवला. यावेळी सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) आर. के. मुखर्जी आणि क्यूबिटच्या शाल्वी पारगे उपस्थित होत्या. डॉ. मुखर्जी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सैनिकांना व्हीआर हेडसेटच्या माध्यमातून ३६० अंशांमध्ये आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या अनुभवात सहभागी झालेल्या सैनिकांनी आनंद व्यक्त केला. प्रत्यक्ष मंदिरात जाता येत नसले तरी, व्हीआर तंत्रज्ञानामुळे आपण बाप्पासमोरच उपस्थित असल्याची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. क्यूबिटच्या शाल्वी पारगे म्हणाल्या, “गणेशोत्सव हा बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येऊन आरती करण्याचा उत्सव आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्या व्यक्तींनाही या अनुभवापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “पीआरसीमधील सैनिकांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक होता. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भावनिक आणि आध्यात्मिक नाते निर्माण करून आरतीचा अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येणे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.” क्यूबिट गेल्या १० वर्षांपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा व्हीआर अनुभव तयार करत आहे. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या आरतीचे विशेष ३६० अंशांमध्ये चित्रीकरण करण्यासाठी आधुनिक कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. त्यानंतर हे चित्रीकरण व्हीआर ॲप्लिकेशनमध्ये रूपांतरित केले जाते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रत्यक्ष मंदिरात जाता न येणाऱ्या व्यक्तींनाही आरतीचा अनुभव घेता येतो. यापूर्वी या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्ती अशा विविध घटकांना दगडूशेठ गणपतीच्या आरतीचा आभासी अनुभव देण्यात आला आहे.
Source link
सीमेवरच्या जवानांसाठी बाप्पाचे दर्शन घरबसल्या:व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे 45 सैनिकांनी घेतली दगडूशेठ गणपतीची आरती