![]()
शाळेजवळ रिक्षा थांबविल्याच्या कारणावरून चालकाला बेदम मारहाण; जुन्या वादातून दांडक्याने डोके, तोंडावर वार जुन्या वादाचा राग मनात धरून रिक्षाचालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना कल्याणी शाळेच्या परिसरात घडली. रिक्षा शाळेजवळ लावू नकोस, अशी धमकीही दिल्याचा आरोप असून, याप्रकरणी प्रवीण घाडगे आणि श्रेयस प्रवीण घाडगे यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर शिवाजी शेलार (वय 52, रा. गोजेगाव) हे 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी रिक्षा घेऊन कल्याणी शाळेजवळ थांबले होते. त्यावेळी प्रवीण घाडगे याने जुन्या वादाचा विषय काढून शेलार यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर श्रेयस घाडगे याने मोटारसायकल रिक्षेसमोर लावून शेलार यांना रिक्षेबाहेर ओढले. त्यांच्यावर लाकडी दांडक्याने डोक्यात, तोंडावर आणि पाठीवर वार केल्याचा आरोप आहे. तसेच ‘कल्याणी शाळेच्या परिसरात पुन्हा दिसायचे नाही आणि येथे रिक्षाही लावायची नाही,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला पोलीस नाईक बोराटे तपास करीत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी महिलेचा विनयभंग; पतीला रस्त्यात मारहाण, 24 हजारांच्या मागणीवरून वाद बांधकामाच्या ठिकाणी 23 वर्षीय महिलेशी गैरवर्तन करून शरीरसंबंधाची मागणी केल्याचा तसेच प्रकाराची वाच्यता केल्यास महिलेसह तिच्या कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभिजीत प्रकाश घाडगे आणि अनिकेत विष्णू गवळी यांच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून-जुलै 2026 या कालावधीत रेणावळे आणि बसाप्पाचीवाडी येथील बांधकामाच्या ठिकाणी महिला कामानिमित्त गेली होती. यावेळी अभिजीत घाडगे याने तिच्याशी गैरवर्तन करून शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, महिलेच्या पतीने कामाचे 24 हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून पाटखळ माथा परिसरातील कॅनॉलजवळ त्याला मारहाण झाल्याची दुसरी घटना घडली. अभिजीत घाडगे आणि अनिकेत गवळी यांनी पतीला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोघेही बसाप्पाचीवाडी येथील रहिवासी आहेत. महिला पोलीस हवालदार बोराटे तपास करीत आहेत. वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांशीच हुज्जत; प्रतापसिंहनगरात शिवीगाळ-धक्काबुक्की, शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा घरगुती वादाची माहिती मिळाल्यानंतर मदतीसाठी पोहोचलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार प्रतापसिंहनगर, खेड येथे घडला. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी संतोष अशोक लंकेश्वर याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सागर लंकेश्वर यांच्या घरासमोर वाद सुरू असल्याची माहिती 112 क्रमांकावरून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतोष लंकेश्वर याला वाद थांबवून शांतता राखण्याची समज दिली. मात्र, त्याने पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘तुम्ही माझ्या बायकोची छेड काढता का, तुमच्यावर गुन्हा दाखल करतो,’ असे म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. पोलीस कॉन्स्टेबल रणजीत कारंडे यांनी फिर्याद दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस हवालदार खाडे तपास करीत आहेत. किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी, फडतरवाडीत मारहाणीनंतर थरार; माजी सैनिकासह मित्रावर हल्ला आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यानंतर दोन व्यक्तींनी बंदुका घेऊन येत माजी लष्करी जवानासह त्याच्या मित्राच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार फडतरवाडीतील श्री आत्मगजानन अॅकॅडमी परिसरात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पांडुरंग डंबाळे याने निलेश कणसे यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पांडुरंगचे वडील दत्तात्रय व आप्पासाहेब डंबाळे, निखिल कदम तसेच अॅकॅडमीतील 5-6 विद्यार्थ्यांनी निलेश कणसे आणि त्यांचे मित्र सचिन कणसे यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याचदरम्यान दोन अनोळखी व्यक्ती बंदुका घेऊन घटनास्थळी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी दोघांच्या डोक्याला बंदूक लावत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यातील एका व्यक्तीने कुकरीच्या दांड्याने निलेश कणसे यांच्या कानावर मारल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पांडुरंग, दत्तात्रय आणि आप्पासाहेब डंबाळे यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय काटकर तपास करीत आहेत.
हेही वाचा.. शिंदेंचे नेते मोदी-शहा, बाळासाहेब नव्हे!:कॅबिनेटमध्ये जरांगेंना शिव्या घालून पहाटे पायाशी का गेलात?; संजय राऊतांचा हल्लाबोल “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हा मुळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच पक्ष आहे. आमचे मुख्यालय दादरचे शिवसेना भवन आणि ‘मातोश्री’ आहे, तर त्यांच्या पक्षाचे मुख्यालय अहमदाबादला आहे. त्यामुळे आपल्या पक्षप्रमुखांना मुजरा करण्यासाठी शिंदे थेट गुजरातला गेले आहेत,” असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा गुजरात दौरा, मराठवाड्यातील 760 अपूर्ण आश्वासने, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सरकारची दुटप्पी भूमिका आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मिळालेल्या नोटीसवर सविस्तर व आक्रमक भूमिका मांडली. सविस्तर वाचा..
Source link
साताऱ्यात गुन्हेगारीचा थरार:रिक्षाचालकाला बेदम मारहाण, महिलेचा विनयभंग अन् पोलिसांशी हुज्जत