Headlines

आमची उपसमिती एकमेव, जिची दर कॅबिनेटनंतर बैठक होते:विखे पाटील, भुसे आणि लाड यांनी दिलेल्या शब्दाची सरकार नक्कीच पूर्तता करणार- देसाई




मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, ‘सातारा गॅझेट’बाबतचे काम मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या मुदतीतच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारची उपसमिती अत्यंत वेगाने काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना काही आश्वासने दिली होती. यावर पत्रकार परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, “काल आमचे सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना जे आश्वासन दिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. निर्धारित वेळेतच आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत.” दर कॅबिनेटनंतर उपसमितीची बैठक मराठा आरक्षणासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या उपसमितीच्या कामकाजाबद्दल माहिती देताना देसाई यांनी सांगितले की, या समितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. “मी यापूर्वीही सांगितले आहे की, आमची उपसमिती ही एकमेव अशी समिती असेल जिची बैठक प्रत्येक राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीनंतर नियमितपणे होते. या बैठकीत जरांगे यांच्या सर्व मागण्यांवर आणि मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतले जातात,” असे ते म्हणाले. सातारा गॅझेटबाबतच्या कार्यवाहीवर बोलताना देसाई म्हणाले, “कॅबिनेटनंतर होणाऱ्या आमच्या उपसमितीच्या बैठकांमध्ये आम्ही सर्व प्रलंबित कामांचा आणि निर्णयांचा आढावा (रिव्ह्यू) घेतो. त्यामुळे सरकारने जी वेळ निश्चित केली आहे, त्या वेळेतच सातारा गॅझेटचे काम आम्ही नक्कीच पूर्ण करू,” असा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त करत मराठा समाजाला आश्वस्त केले आहे. यापुढे जरांगेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही – शिष्टमंडळ दरम्यान, यापुढे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहेत, असे वक्तव्य शिष्टमंडळाकडून करण्यात आले. मराठा समाजाशी खुन्नस ठेवणे योग्य नाही- जरांगे मनोज जरांगे पाटील म्हणाले, 58 लाख नोंदी कमी होणार नाहीत, याची सरकारने खात्री द्यावी. या नोंदी शोधण्यासाठी आम्ही स्वतः माणसे देतो. शिंदे समिती काम करत नाही आणि सरकारही याकडे लक्ष देत नाही. हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही. ही लढाई थांबणार नाही अन् मी उपोषणही सोडणार नाही. आम्हाला आश्वासन दिले, तरी आंदोलन सुरूच राहणार आहे. मराठा समाजाशी खुन्नस ठेवणे योग्य नाही. राधाकृष्ण विखे पाटील चुकतात, तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही आपण प्रेम करू, पण आता नाही! कोणत्याही मंत्र्याने टीका केली, तर आम्ही गप्प बसणार नाही. जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी. 58 लाख नोंदींमधील एकही नोंद कमी व्हायला नको…नोंदी कमी करणार नाही, याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आलं, तर काय करणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. —————– हेही वाचा.. मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित: मराठा आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 दिवस उपोषणाला बसले होते. आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र आंदोलन सुरुच राहणार आहे. तर 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर भविष्यात सरकारने जर दगा फटका केला तर आता उपोषण करणार नाही थेट मुंबईत आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. जरांगे यांची तब्येत खालावलेली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *