![]()
पुण्यात विक्रम सोलर लिमिटेडने ‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ ही खास मोहीम सुरू केली आहे. गणेशोत्सवातील भक्तीला सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छ ऊर्जेची जोड देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत भक्तांनी बाप्पाच्या चरणांना केलेला प्रत्येक स्पर्श ‘ऊर्जा पॉईंट्स’मध्ये बदलला जाईल. या पॉईंट्समधून गरजू गाव किंवा शाळेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मदत केली जाईल. या मोहिमेची सुरुवात टिळक रस्त्यावरील शेंडगे वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात झाली. मोहिमेसाठी दोन ‘सौर अनुभव व्हॅन’ पुण्यातील वेगवेगळ्या भागांत फिरत आहेत. या व्हॅनमधून भक्तांना बाप्पाच्या चरणांना स्पर्श करण्याचे आवाहन केले जात आहे. जेव्हा भक्त चरणस्पर्श करतात, तेव्हा बाप्पाभोवती असलेले सौर ‘ऊर्जामंडल’ प्रकाशित होते. यातून भक्तीचे रूपांतर अक्षय ऊर्जेच्या योगदानात कसे होते, याचा अनुभव दिला जात आहे. गणेश मंडळे आणि सौर अनुभव व्हॅनमधून जमा झालेले ‘ऊर्जा पॉईंट्स’ एकत्र केले जातील. या पॉईंट्सचा वापर निवडलेल्या गावातील किंवा शाळेतील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केला जाईल. गणेशोत्सवाद्वारे स्वच्छ ऊर्जेबद्दल जागरूकता वाढवणे आणि लोकांच्या सहभागातून सामाजिक बदल घडवणे, हा कंपनीचा प्रयत्न आहे. विक्रम सोलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर नागपाल यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा श्रद्धा आणि एकत्र येण्याचा उत्सव आहे. समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त करण्याची ही वेळ आहे. ते म्हणाले, “प्रत्येक चरणस्पर्श हा भक्तीचा क्षण असला तरी, त्यातून एखाद्या गावाला किंवा शाळेला सौरऊर्जेद्वारे वीज मिळू शकते. वैयक्तिक भक्तीच्या क्षणांचे सामूहिक परिणामात रूपांतर करणे, ही या मोहिमेमागील मुख्य कल्पना आहे.” ‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ ही मोहीम विक्रम सोलरच्या ‘सिक्सेस फॉर सोलर’ या उपक्रमाला पुढे घेऊन जाणारी आहे. आनंदाच्या आणि सामूहिक सहभागाच्या क्षणांचे रूपांतर समाजासाठी सौरऊर्जेच्या योगदानात करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे नागपाल यांनी स्पष्ट केले.
Source link
बाप्पाच्या चरणी स्पर्श:गाव-शाळांना मिळणार वीज; पुण्यात विक्रम सोलरचा अनोखा उपक्रम