![]()
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आपले २० दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. या संपूर्ण घडामोडींवरून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. जरांगेंचे हे आंदोलन म्हणजे लोकांच्या हिताचा लढा नसून, एखाद्या टीव्ही मालिकेसारखा दरवर्षी ठरवून येणारा नवा ‘सीझन’ असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. ठरवून केलेला राजकीय ‘शो’ पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी या आंदोलनाला एक ‘स्क्रिप्टेड ड्रामा’ म्हटले आहे. त्यांच्यामते, हे केवळ जातीय आणि प्रदूषित राजकारण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राजकीय शोचे निर्माते आहेत, मंत्री उदय सामंत याचे दिग्दर्शन करत आहेत, तर मनोज जरांगे हे केवळ एका अभिनेत्याची भूमिका बजावत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘आता गर्दी उरलेली नाही, प्रतिसाद ओसरलाय’ पूर्वीच्या आंदोलनांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आता पूर्णपणे ओसरला असल्याचे सदावर्ते म्हणाले. आंतरवाली सराटीमध्ये प्रत्यक्षात फारशी गर्दी नसतानाही केवळ माध्यमांमधून चित्र मोठे करून दाखवले जात आहे. तसेच, जरांगे पाटील यांनी महिला अधिकाऱ्यांबाबत जी भाषा वापरली, ती अत्यंत आक्षेपार्ह असून महिला आयोगाने या बेताल वक्तव्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ‘मरण्याचा अधिकार कुणालाही नाही’ उपोषणाच्या नावाखाली रस्ते अडवणे, जाळपोळ करणे आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सदावर्तेंनी दिला. संविधानाने प्रत्येक नागरिकाला ‘जगण्याचा अधिकार’ (राईट टू लाईफ) दिला आहे, ‘मरण्याचा अधिकार’ (राईट टू डाय) नाही. त्यामुळे जरांगेंची प्रकृती खरोखरच चिंताजनक असेल, तर प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर थेट वैद्यकीय उपचार करावेत, असे त्यांनी प्रशासनाला सुनावले. बोगस प्रमाणपत्रांवरून कायदेशीर इशारा मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या पद्धतीवरही सदावर्तेंनी ताशेरे ओढले. केवळ निजामकालीन कागदपत्रे दाखवून आरक्षणाचा दावा करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. एकाच समाजाला वेगवेगळ्या प्रवर्गांत बसवणे संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे सरकारने कुणालाही नियमबाह्य पद्धतीने प्रमाणपत्रे देऊ नयेत आणि बोगस प्रमाणपत्रे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, अशी आक्रमक भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे. हेही वाचा.. मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित: मराठा आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 दिवस उपोषणाला बसले होते. आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र आंदोलन सुरुच राहणार आहे. तर 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर भविष्यात सरकारने जर दगा फटका केला तर आता उपोषण करणार नाही थेट मुंबईत आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. जरांगे यांची तब्येत खालावलेली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
20 दिवसांचा रिॲलिटी शो संपला:जरांगेंच्या उपोषणावर सदावर्तेंचा घणाघात, म्हणाले- आता पूर्वीसारखी हवा राहणार नाही