![]()
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले तब्बल 20 दिवसांचे उपोषण अखेर स्थगित केले. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, या काळात ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पाटोद्यात सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांच्यासह सरकारी अधिकारी पाटोदा येथे पोहोचले. पहाटे झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पॅरिसमधून उदय सामंतांचा संवाद या संपूर्ण घडामोडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे. सामंत सध्या पॅरिसमध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित परिषदेसाठी गेले असताना त्यांनी जरांगे यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांनी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. साडेतीन तासांच्या चर्चेचा दावा उपोषण स्थगित व्हावे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा पुढे जावी यासाठी सामंत यांनी पॅरिसमधून जवळपास साडेतीन तास संवाद साधल्याची माहिती आहे. जरांगे यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा, सरकारमधील वरिष्ठ नेत्यांशी समन्वय आणि त्यानंतर बीडमध्ये असलेल्या शिष्टमंडळाशी संपर्क अशा पद्धतीने घडामोडी पुढे गेल्याची मागिची आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी वारंवार चर्चा मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी काल दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चा केली. त्यानंतर फडणवीस, शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि उदय सामंत यांच्यात कॉन्फरन्स कॉलवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पुढे जरांगे यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधण्यात आला आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित करण्याबाबत समन्वय साधला गेल्याचा दावा आहे. ‘केंद्रबिंदू पॅरिस’ची चर्चा जरांगेंच्या उपोषणाच्या ठिकाणी सरकारचे नेते प्रत्यक्ष चर्चा करत असताना या घडामोडींना पॅरिसमधूनही दिशा देण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पाटोदा येथील चर्चेसोबतच उदय सामंत यांचा पॅरिसमधून झालेला संवाद हा या प्रकरणातील महत्त्वाचा पडद्यामागचा भाग ठरल्याची चर्चा आहे. सरकारला 90 दिवसांची मुदत जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाशी संबंधित मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. हैदराबाद गॅझेटियर, कुणबी नोंदी आणि इतर गॅझेटियरशी संबंधित मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मुद्द्यांवर सरकारकडून कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले आहे. उपोषण स्थगित, आंदोलन मात्र संपलेले नाही उपोषण स्थगित केले असले तरी मराठा आरक्षणाचे आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेले नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत सरकारकडून मागण्यांवर ठोस कार्यवाही होते का, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे २० दिवसांच्या उपोषणानंतर तात्पुरता तणाव कमी झाला असला तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. —————– हेही वाचा.. मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित: मराठा आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 दिवस उपोषणाला बसले होते. आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र आंदोलन सुरुच राहणार आहे. तर 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर भविष्यात सरकारने जर दगा फटका केला तर आता उपोषण करणार नाही थेट मुंबईत आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. जरांगे यांची तब्येत खालावलेली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
पडद्यामागे नेमकं काय घडलं?:जरांगेंच्या उपोषण मागे घेण्यामागे 'पॅरिस' कनेक्शन! मंत्री उदय सामंतांची मध्यस्थी पुन्हा यशस्वी