![]()
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमनेसामने आल्याची अत्यंत गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड आणि संभाव्य धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बदलापूरहून येणारी फास्ट लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी अचानक 5 कडे वळवण्यात आली, जिथे आधीच एक लोकल उभी होती. मात्र समोर दुसरी गाडी असल्याचे लक्षात येताच मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि तातडीने लावलेल्या ब्रेक्समुळे दोन्ही गाड्यांमध्ये अवघ्या 120 मीटरचे अंतर राहिले आणि मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या सिग्नल आणि ट्रॅक व्यवस्थापनातील संभाव्य त्रुटीमुळे घडलेल्या या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत, प्रशासनाने जबाबदारी निश्चित करत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. तज्ज्ञांच्या मते, दोन गाड्या एकाच ट्रॅकवर येण्याची घटना अत्यंत दुर्मिळ असून, सिग्नल प्रणाली किंवा ट्रॅक कंट्रोल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्यासच अशी परिस्थिती उद्भवू शकते. याच कारणामुळे रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणातील तांत्रिक त्रुटींचा सखोल तपास केला जात आहे. सीएसएमटी येथील ही घटना रेल्वेच्या सुरक्षितता यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. दुसरीकडे, रेल्वेच्या कामकाजात बुधवारी झालेला हा सलग तिसरा बिघाड ठरल्याने प्रवाशांचा संयम सुटला आहे. पहाटे खर्डी येथील ब्लॉकची वाढलेली वेळ आणि त्यानंतर डोंबिवलीत पूर्वसूचनेशिवाय घेतलेला ब्लॉक यामुळे लोकलचे वेळापत्रक आधीच कोलमडले होते. त्यातच सीएसएमटी येथील या घटनेची भर पडल्याने सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या गोंधळामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागला असून, रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Source link
CSMT स्थानकावर दोन लोकल आमनेसामने:मोठा अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित; रेल्वे प्रशासनाची कारवाई