![]()
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रश्न आणि विकासाच्या अपेक्षा मांडण्याचे व्यासपीठ ठरत आहे. पिंपरी पेंढार येथील श्री चारंगबाबा नवतरुण मित्र मंडळाने साकारलेल्या ‘परिवर्तन एक्सप्रेस’ या चलचित्र देखाव्यातून पुणे-नाशिक रेल्वेची जनभावना कल्पकतेने मांडण्यात आली आहे. देखाव्यात पुणे-नाशिक रेल्वे जुन्नर तालुक्यातून धावताना दाखवण्यात आली असून, रेल्वेमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला कशी गती मिळू शकते, याचे चित्रण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पुणे, नाशिकसह मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे, शेतमालाला बाजारपेठ मिळणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, स्थानिक व्यवसायांना चालना मिळणे आणि दळणवळण गतिमान होणे, या अपेक्षा यातून मांडण्यात आल्या आहेत. जुन्नर हा इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाने समृद्ध तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या या परिसराला आधुनिक वाहतूक व्यवस्थेची जोड मिळाल्यास पर्यटन, शेती, व्यापार, शिक्षण आणि उद्योगाला चालना मिळू शकते, अशी भावना देखाव्यातून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाबाबतचा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. ‘परिवर्तन एक्सप्रेस’च्या माध्यमातून विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतरावरही अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आले आहे. रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात कधी धावणार, असा सवाल नागरिकांच्या अपेक्षांमधून उपस्थित करण्यात आला आहे. देखाव्याची संकल्पना सिव्हिल इंजिनिअर संकेत देविदास विधाटे यांनी मांडली. मंडळातील युवकांच्या मेहनतीतून हा देखावा साकारण्यात आला. दत्तात्रय विधाटे, मयूर दुरगुडे, वेदांत कुटे, संस्कार दुर्गुडे, कुणाल विधाटे, रोहित गव्हाणे, निशांत दुर्गुडे यांच्यासह युवकांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशोत्सवातील हा देखावा मनोरंजनापलीकडे जाऊन परिसराच्या विकासाची अपेक्षा आणि पुणे-नाशिक रेल्वेच्या मागणीला व्यासपीठ देत आहे.
Source link
लक्षवेधी गणेशोत्सव:रुळांची वाट पाहतोय जुन्नर; गणरायासमोर ‘परिवर्तन एक्सप्रेस’!