![]()
वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी तर छत्रपती संभाजीनगर परिमंडलात साडेतेरा लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत येणारी वीज हजारो किलोमीटरच्या जाळ्यातून येते, ज्यात अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे येतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. सध्या अनेक ग्राहक ऑनलाइन पर्यायांऐवजी वैयक्तिक तक्रारींवर अधिक भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ खर्ची पडत आहे. महावितरणची सेवा मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे सर्वांना सहज व 24 तास उपलब्ध आहे. शेकडो कर्मचाऱ्यांसह ही सेवा केंद्रे कार्यरत आहेत. ग्राहकांनी तक्रार नोंदवताना त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक दिल्यास महावितरणला संबंधित माहिती तात्काळ उपलब्ध होते. यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही आणि तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. ऑनलाइन प्रणालीत नोंद झालेल्या तक्रारींचे विद्युत नियामक आयोगाने घालून दिलेल्या मानकांनुसार वेळेत निराकरण करणे बंधनकारक असते. टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाइन प्रणालीत होते, याउलट एखाद्या वीज कर्मचाऱ्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास कर्मचाऱ्याला एकाच वेळी अनेक फोन येतात, ज्यामुळे त्याला फॉल्ट शोधणे कठीण होते. तसेच, खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना फोनवर बोलणे कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही टोल फ्री क्रमांकांचा वापर महत्त्वाचा आहे.
Source link
वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा