![]()
पुणे-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे गावाजवळ भूमकर पुलावर साखळी अपघात झाला. भरधाव कंटेनरने काँक्रीट पंप टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. ही घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज गणपतलाल वैष्णव (वय २४, रा. अजमेर, राजस्थान) हा कंटेनर (क्रमांक आरजे ०१ जीबी ९८९७) घेऊन मुंबईकडे जात होता. भूमकर पुलाजवळ त्याने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून पुढे जाणाऱ्या काँक्रीट पंप टेम्पोला (क्रमांक एमएच १२ एक्सएम ९२०७) मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, काँक्रीट पंप टेम्पो पुढे असलेल्या ट्रकवर (क्रमांक केए ०१ एटी ६२२२) आदळला आणि त्यात घुसला. या अपघातात टेम्पोमधील संदीप जगन्नाथ कुमार (वय २२, रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या साखळी अपघातात पुढील ट्रकचा चालक, काँक्रीट पंप टेम्पोचा चालक आणि त्यातील अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त वाहनांच्या जवळून जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील (क्रमांक एमएच १४ केएस ५०६७) एक व्यक्तीही जखमी झाली. कंटेनरचालक धनराज वैष्णव यालाही दुखापत झाली. अपघातात कंटेनर, काँक्रीट पंप टेम्पो, ट्रक आणि कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभाग आणि नऱ्हे पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरू केली. कंटेनरचालक धनराज वैष्णव याच्याविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जखमी असल्याने ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हेही वाचा.. पुणे आरटीओ चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:पाच वर्षांच्या मुलासह तिघे गंभीर जखमी, ससून रुग्णालयात उपचार सुरू पुणे आरटीओ चौकात ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील पाच वर्षांच्या मुलासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. सविस्तर वाचा
Source link
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात:कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, भूमकर पुलाजवळ साखळी अपघातात 6 जखमी