Headlines

अमरावती व्हिडिओ प्रकरण:अयानसह चौघांना 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; महिंद्रा थार, मोबाईल, पिस्तूलचा तपास करणार




अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेला अयान अहमद आणि त्याच्या तीन साथीदारांची पोलीस कोठडी (PCR) २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते निदर्शने करत होते. आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी होती. कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने न्यायालयाबाहेर पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती, ज्यामुळे न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान, सहायक सरकारी वकील डी. ए. नवले आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी सर्व चारही आरोपींची पुन्हा आठवडाभराची पोलीस कोठडी मिळवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदचा एक नवीन व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये अयान महिंद्रा थार गाडीत बसलेला दिसत असून, त्याच्या शेजारी महागडे मोबाईल, पिस्तूलसदृश वस्तू आणि नोटांचे बंडल ठेवलेले आहेत. पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, अयानने हे वाहन कोठून मिळवले, त्यातील शस्त्र खरेच पिस्तूल आहे का आणि नोटांचे बंडल कोणाचे होते, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवणे आवश्यक आहे. एसआयटी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा हा युक्तिवाद योग्य वाटल्याने न्यायालयाने अयानसह चौघांच्याही पोलीस कोठडीत एक आठवड्याची वाढ केली. अयान, त्याचे साथीदार उजेर खान इकबाल खान, मो. साद इकबाल खान आणि तरबेज खान मो. साबीर यांच्यावर १३ एप्रिल रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४, पॉक्सोचे कलम ८ व १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ व ६७ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. आतापर्यंत अयान अहमदने आठ अल्पवयीन मुलींशी, तर त्याचा साथीदार उजेरने एका मुलीशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. या गैरवर्तनाचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो या दोघांसह त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी व्हायरल केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सुमारे ४७ अधिकारी-कर्मचाऱ्यांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे. चार दिवसांपूर्वी अयानविरुद्ध एका १५ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली होती, ज्याचा जबाब एसआयटीने नोंदवून घेतला आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी उजेरविरुद्ध एका १६ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे, ज्यात उजेर तिला सतत संदेश पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *