Headlines

सरकारला आता 1 कोटी मतांची ताकद दाखवण्याची वेळ- अभिजित दीपके:गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगणात स्पर्धा परीक्षार्थींशी चर्चा‎




आपल्या मागण्या अनेकदा निवेदनाद्वारे सरकारपर्यंत पोहोचवूनही त्यांची दखल घेतलेली नाही. राज्यात सुमारे १५ ते २० लाख उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. प्रतिकुटुंब ४ ते ५ व्यक्ती धरल्यास ही ताकद सुमारे एक कोटी मतांची होते. त्यामुळे आता सरकारला या एक कोटी मतांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा थेट इशारा अभिजित दीपके यांनी तरुणाईंशी सवांद साधताना दिला. शनिवारी (दि. १९) सायंकाळी अभिजित दीपके शहरात आले होते. श्री गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रांगणात जमलेल्या हजारो तरुण-तरुणींशी त्यांनी संवाद साधला. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा; अन्यथा ते पुन्हा (सत्तेत) येणार नाहीत, असा दावाही दीपके यांनी यावेळी केला. संवाद सत्रादरम्यान स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्वलंत समस्या दीपके यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ओळखपत्र (कार्ड) असावे., सरकारी नोकरीप्रमाणेच लोकप्रतिनिधींनाही निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बंधनकारक असावी, विद्यापीठांची परीक्षा व मूल्यमापन व्यवस्था सुधारावी. पोलिस भरतीदरम्यान सुविधांअभावी होणारे तरुणांचे हाल तातडीने थांबवावे, एमपीएससी परीक्षेत पर्यायी प्रश्नपद्धतीच कायम ठेवावी. सतत परीक्षा लांबणीवर पडत असल्यामुळे प्रामुख्याने विद्यार्थिनींच्या करिअरवर मोठे संकट निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर फक्त परीक्षाच द्यायच्या का? असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी या मागण्या सरकारदरबारी लावून धरण्याचा आग्रह केला. यावर, समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांमधूनच नेतृत्व आणि आंदोलक तयार झाले पाहिजेत, असे आवाहन दीपके यांनी केले. या कार्यक्रमासाठी कोणताही औपचारिक मंच उभारण्यात आला नव्हता. वर्तुळाकार पध्दतीने जमिनीवर बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या मध्यभागी उभे राहून दीपके यांनी संवाद साधला. अनेक तरुण-तरुणींनी यावेळी त्यांना थेट प्रश्न विचारून आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला तरुणाईने ‘मिडीया गो बॅक’ असे नारे लावले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *