![]()
अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणी, मशागत आणि बियाण्यांवर खर्च करूनही उत्पन्नाची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेवगाव तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी केली. या मागणीसाठी भाकप, महाराष्ट्र राज्य किसान सभा, शिवसेना (उबाठा) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ॲड. लांडे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळावर केवळ चर्चा आणि चिंता व्यक्त करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेवगाव तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने विलंब न करता दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्यावी. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आकाश दहाडदे यांना देण्यात आले. यावेळी कॉ. संदीप इथापे, बापूराव राशिनकर, बबनराव पवार, विष्णू गोरे, गोरक्षनाथ काकडे, रामनाथ गोल्हार, राजेंद्र दळवी, ॲड. अविनाश मगरे, कानिफनाथ कर्डिले, अजिंक्य लव्हाट, उदय गांगुर्डे, दत्तात्रय फुंदे, मच्छिंद्र आरले उपस्थित होते. कृत्रिम पावसाचे नियोजन अन् दिवसा अखंड वीज द्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पीक विमा योजनेअंतर्गत आगाऊ विमा भरपाई मंजूर करावी, कृत्रिम पावसाचे नियोजन करावे, शेतीसाठी दिवसा अखंड व सुरळीत वीजपुरवठा करावा, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Source link
शेवगाव दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या:तहसीलसमोर भाकप, किसान सभा, उबाठा, "स्वाभिमानी''चे आंदोलन