![]()
वय ८५… पण आवाजात तोच जोश, शब्दांत तोच ठेका आणि आठवणींमध्ये संगमनेरच्या संघर्षाचा अख्खा इतिहास! वडगाव पान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह आयोजित शेतकरी मेळाव्यात म्हाळू बाबा साबळे व्यासपीठावर आले आणि अवघा माहोलच बदलला. ‘हे
.
शेतकऱ्यांमध्ये बसलेल्या म्हाळूबाबांना पाहताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून आपल्या शेजारी बसवले. सभापती शंकर पाटील खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर डॉ. जयश्री थोरात यांच्यासह उपस्थितांनी म्हाळूबाबांना भलरीचे वाण सादर करण्याची विनंती केली. बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या हातात माईक दिला अन् सुरू झाली संगमनेरच्या संघर्षाची भलरी!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमापासून प्रवरा नदीपर्यंत…
सुमारे सात मिनिटांच्या या भलरीत म्हाळूबाबांनी केवळ लोककलेचा ठेका धरला नाही, तर संगमनेरच्या परिवर्तनाचा इतिहासच उलगडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, प्रवरा नदी, भाऊसाहेब थोरात यांचा पाणी संघर्ष, सहकारातून उभारलेला साखर कारखाना, निळवंडे धरण आणि कालव्यांना आलेले पाणी अशा विविध टप्प्यांची त्यांनी आपल्या खास शैलीत सांगड घातली. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यापासून पाण्याच्या उपलब्धतेने प्रगतिशील वाटचाल करणाऱ्या संगमनेरपर्यंतचा हा प्रवास प्रत्येक कडव्यातून जिवंत झाला. म्हाळूबाबांचे पुतणे कारभारी साबळे यांनीही ‘भले भाऊ भले’ म्हणत त्यांना साथ दिली.
‘जुनी माणसे आपली आदर्श’ माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘जुनी माणसे ही आपली आदर्श आहेत. त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. आपल्या संगमनेर तालुक्याला संघर्षाचा मोठा इतिहास असून त्यातूनच समृद्धी निर्माण झाली आहे. मात्र, आपले पाणी पळवले जात आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. मेळाव्यानंतर थोरात यांच्या हस्ते म्हाळू बाबा साबळे यांचा गौरव करण्यात आला. भलरीचा हा अनोखा क्षण उपस्थितांच्या स्मरणात राहिला. कार्यक्रमानंतर म्हाळूबाबांच्या भलरीचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आले.