![]()
हिंगोली जिल्ह्यातील सेलसुरा येथील तरुण शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीमुळे पिके वाळून गेल्याने राहत्या घरी सोमवारी ता. 21 गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलसुरा येथील शेतकरी दत्तराव घुगे (40) यांना सेलसुरा शिवारातच सुमारे दोन एकर शेत आहे. या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी आई, पत्नी, तीन मुली असा परिवार असून मुलींचे शिक्षण सुरु आहे. हाताशी आलेली पिके करपली दरम्यान, सेलसुरा शिवारातील सुमारे दोन एकर शेतात त्यांनी सोयाबीन व कापूस पिके घेतली आहेत. मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने खंड दिल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्याच नाही तसेच काही ठिकाणी शेंगा भरल्याच नाहीत. त्यातच सोयाबीन वाळून गेले या शिवाय कापूस पिकांचीही वाढ झाली नाही. तसेच कापसाचीही फुलगळ होऊ लागली. यामुळे लागवडीचाही खर्च हाती येणार नसल्याने ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. पिक हातचे गेल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. पहाटे उघडकीस आला प्रकार दरम्यान, रविवारी ता. 20 रात्री दत्तराव व त्यांचे कुटुंबिय भोजन करून झोपले होते. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुटुंबिय जागे झाल्यानंतर दत्तराव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. शेजारी मदतीसाठी धाऊन आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक मयूर रसाळ, उपनिरीक्षक विकास आडे, जमादार संदीप सांगळे, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
Source link
पिके करपल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा?:चिंताग्रस्त तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सेलसुरामधून हळहळ